
दहावी नंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ‘संस्थास्तरीय प्रवेश फेरी’चे आयोजन
पुणे : दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या पुणे विभागातील शासकीय आणि निमशासकीय तंत्रनिकेतनातील संभाव्य रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ‘संस्थास्तरीय प्रवेश फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तंत्रनिकेतन पुणे, कोल्हापूर, मिरज, कराड, सोलापूर आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी येथे बुधवारपासून (ता.१३) रिक्त जागांसाठी समुपदेशन प्रवेश फेरी होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत संस्थास्तरीय प्रवेश फेरी नुकतीच जाहीर झाली आहे. ;या फेरीनुसार शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन (तासगाव) आणि कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अनुदानित) येथे गुरुवारी (ता.१४) ही प्रवेश फेरी होणार आहे. तर शासकीय तंत्रनिकेतन (अवसरी खुर्द) आणि महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे शनिवारी (ता.१६) संस्थास्तरीय प्रवेश फेरी होणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत अद्याप प्रवेश न मिळालेले, तसेच प्रवेश घेतला आहे आणि संस्था व शाखा यात बदल करायचा आहे, तसेच नव्याने नोंदणी करून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी या प्रवेश फेरीसाठी पात्र आहेत. संबंधित संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्र आणि कागदपत्रांसह सकाळी नऊ वाजता हजर राहावे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. द. व्यं. जाधव यांनी दिली आहे.