मंचर - पळसठीका (ता.आंबेगाव) येथील सह्याद्री संस्था संचलित बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपण केंद्रातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाला शुक्रवारी (ता.१४) दुपारी अचानक किडनी स्टोनचा त्रास झाल्याने त्याला लघवी होत नव्हती. तो असह्य वेदनेने रडत होता.
वेळेत योग्य उपचार न झाल्यास शनिवारी (ता. १५) त्याचा इतिहासाचा पेपर बुडणार व वर्ष वाया जाणार या काळजीत वस्तीगृह संस्थेचे पदाधिकारी होते. मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. मारुती दाडगे, डॉ. प्रिया चव्हाण व परिचारिकांनी शर्तीचे प्रयत्न करून विना शस्त्रक्रिया १७ ते १८ एमएम आकाराचा खडा बाहेर काढला. शनिवारी सकाळी मुलाने हसत जाऊन परीक्षा केंद्रावर पेपर दिला.
मुलाला त्रास होत असल्याने सह्याद्री संस्थेचे सचिव विलास पंदारे, व्यवस्थापिका वैशाली पंदारे व अधीक्षक प्रिया पोळ यांनी प्रथम मुलाला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. मुलाच्या वेदना व रडणे थांबत नसल्याने वसतिगृहाचे अधिकारी चिंतेत होते. शनिवारी होणाऱ्या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन व मुलाची केविलवाणी झालेली अवस्था पाहून त्याला मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले.
भूल देऊन त्याला मूत्र नलिकेद्वारे किडनी स्टोन लवकर बाहेर पडावा यासाठी काही बाह्य उपचार कौशल्य डॉ. दाडगे व डॉ. चव्हाण यांनी वापरले त्यात त्यांना यश आले. अर्ध्या तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर किडनी स्टोन बाहेर पडला. मुलाच्या वेदना थांबून त्याचा चेहरा आनंदाने फुलाला.
'किडनी स्टोन बाहेर काढणे शक्य न झाल्यास पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे दुर्बीणीद्वारे इंडोस्पोपिक पद्धतीची शस्त्रक्रिया करून किडनी स्टोन बाहेर काढावा लागला असता. त्यानंतर मुलाला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले असते. मुलाला शनिवारचा पेपर देता आला नसता.
त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण डॉ. मारुती सिद्दाराम दाडगे, डॉ. प्रिया चव्हाण व परिचारिकांनी किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी अर्धा तास केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. डॉ. दाडगे व डॉ. चव्हाण हे आमच्यासाठी देवदूतच ठरले.'
- विलासराव पंदारे, सचिव, सह्याद्री संस्था, पळसठीका (ता.आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.