शतावरी मुळांचे ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह वाळवण

शतावरी मुळांचे ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह वाळवण
Published on: 

पान ८ टेक्नोवनसाठी

शतावरी मुळांपासून पावडर निर्मितीसाठी
ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह वाळवण तंत्र
-----------------
काढणीनंतर शतावरीची मुळे योग्यरीत्या वाळवणे आणि साठवणे हे गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. पारंपरिक उन्हातील वाळवणात मुळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंट आणि कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंगचा एकत्रित वापर करणारे ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह वाळवण तंत्र शतावरी मुळांच्या पावडरनिर्मितीसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकते.
------------------
डॉ. स्नेहल जाधव-कांबळे
------------------
औषधी वनस्पतींची मागणी वाढत असल्याने शतावरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत शतावरीची व्यावसायिक लागवड होते. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या विविध प्रकारच्या जमिनीत आणि उष्णकटिबंधीय, दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. शतावरी (Asparagus racemosus) ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. शतावरीच्या मुळांचा विविध औषधांच्या निर्मितीमध्ये वापर केला जातो. शतावरीची मुळे काढणीनंतर जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे काढणीनंतर वेळेत प्रक्रिया करून त्यांचे वाळवण करणे आवश्यक आहे. मुळे काढल्यानंतर लगेच बाजारात विकण्याऐवजी त्यावर योग्य प्रक्रिया केल्यास उत्पादनाचे मूल्य वाढवता येते. त्यासाठी ऑस्मो-कन्वेक्टिव्ह वाळवण ही आधुनिक प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. या तंत्रज्ञानात मुळांचे ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंट करून त्यातील पाण्याचा अंश नियंत्रित पद्धतीने कमी करून नंतर गरम हवेच्या नियंत्रित प्रवाहात मुळे वाळवून पावडर तयार करता येते.
------------------
पारंपरिक वाळवणातील अडचणी ः
- पारंपरिक पद्धतीने प्रामुख्याने शतावरीची मुळे उन्हात वाळविली जातात. मात्र, उघड्यावर वाळवण करताना हवामानावर अवलंबून राहावे लागते.
- या प्रक्रियेदरम्यान थेट सूर्यप्रकाश, धूळ, माती, कीटक आणि बुरशी यांचा संपर्क शतावरीच्या मुळांना होण्याची शक्यता असते.
- वाळवण प्रक्रियेदरम्यान मुळांचा नैसर्गिक रंग आणि गुणवत्ता बदलण्याची शक्यता असते. रंग काळा किंवा पिवळसर होतो.
या पारंपरिक पद्धतीला पर्याय म्हणून ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरते. या पद्धतीत ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंटनंतर नियंत्रित गरम हवेच्या साहाय्याने शतावरीची मुळे वाळवली जातात. पारंपरिक पद्धतीने वाळवण तंत्रामध्ये विविध अडचणी येतात. त्यासाठी ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग ही आधुनिक पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. या पद्धतीने तयार केलेल्या शतावरी पावडरची गुणवत्ता आणि दर्जा टिकून ठेवण्यास मदत मिळते.
--------------
ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग म्हणजे काय?
पारंपरिक पद्धतीने शतावरीची मुळे वाळवताना रंग, सुगंध, पोत आणि औषधी घटकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या अडचणींवर मात करण्यासाठी ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग (Osmo-Convective Drying) हे आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. या तंत्रज्ञानात मुळांमधील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘ऑस्मोसिस’ आणि ‘कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग’ या दोन पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. त्यामुळे मुळांची गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारे टिकवून उत्तम प्रतीची पावडर तयार करणे शक्य होते.
या पद्धतीने शतावरी मुळांवर प्रक्रिया केल्यामुळे मुळांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून उत्तम प्रतीची पावडर तयार करणे शक्य होते.
या प्रक्रियेमध्ये मुख्यतः दोन टप्पे असतात.

१) ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंट ः
- काढणीनंतर शतावरीची मुळे प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घेतली जातात. त्यानंतर साल काढून मुळांचे योग्य आकाराचे छोटे तुकडे केले जातात.
- हे तुकडे ठराविक तीव्रतेच्या साखर, गूळ, मध किंवा पाम शुगरच्या ठराविक परासरणीय द्रावणात ठराविक वेळ आणि तापमानाला ठेवले जातात.
- या प्रक्रियेत साखर किंवा मिठाच्या द्रावणात मुळांचे तुकडे ठेवल्यानंतर मुळांमधील पाणी हळूहळू बाहेर पडते. त्यामुळे वाळवणापूर्वीच मुळांमधील काही ओलावा कमी होतो.
- ऑस्मोटिक प्रक्रियेमुळे पुढील वाळवणासाठी लागणारा वेळ आणि ऊर्जा कमी करण्यास मदत होते. तसेच योग्य परिस्थितीत मुळांचा रंग, सुगंध, पोत आणि गुणवत्तेतील महत्त्वाचे घटक टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

२) कन्व्हेक्टिव्ह ड्रायिंग ः
ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंटनंतर मुळांमध्ये उर्वरित ओलसरपणा कमी करण्यासाठी हॉट-एअर ड्रायरचा वापर केला जातो. या प्रक्रियेत नियंत्रित तापमान आणि हवेचा प्रवाह वापरून उर्वरित ओलावा कमी केला जातो. त्यामुळे मुळांचे सुरक्षितरीत्या वाळवण होऊन पुढील प्रक्रियेसाठी योग्य कच्चा माल मिळतो. ऑस्मोटिक प्री-ट्रीटमेंटनंतर मुळांचे तुकडे ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला गरम हवेच्या प्रवाहाद्वारे वाळवले जातात.
नियंत्रित तापमान आणि हवेच्या प्रवाहामुळे मुळांचे वाळवण अधिक समान रीतीने करता येते. त्यानंतर वाळलेल्या मुळांची पावडर तयार करता येते.
-------------------
तंत्रज्ञानाचे फायदे ः
- उत्कृष्ट गुणवत्ता ः पावडरचा मूळ पांढरा/फिक्कट रंग, चव आणि औषधी गुणधर्म टिकून राहतात.
- कमी वेळ व ऊर्जा बचत ः ऑस्मोटिक प्रक्रियेमुळे आधीच पाणी कमी झालेले असल्याने ड्रायरमध्ये वाळवण्यासाठी कमी वेळ आणि वीज लागते.
- दीर्घ टिकवण क्षमता ः पावडरमधील पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. तयार पावडर वर्षभरापेक्षा जास्त काळ टिकते.
- गुणवत्तापूर्ण पावडर निर्मिती ः या पद्धतीने वाळवलेली शतावरीची मुळे सहजरीत्या बारीक दळली जातात. त्यामुळे पावडरची गुणवत्ता अधिक आकर्षक दिसते.
- तयार पावडर योग्य पॅकिंगमध्ये भरल्यास हाताळणी, साठवण आणि विक्री सुलभ होते.
-----------------
मूल्यवर्धनाच्या संधी ः
शतावरीची मुळे काढल्यानंतर लगेच बाजारात विकण्याऐवजी त्यावर योग्य प्रक्रिया केल्यास उत्पादनाचे मूल्य वाढवता येते. ऑस्मो-कन्व्हेक्टिव्ह वाळवण ही त्यासाठी वापरता येणारी आधुनिक प्रक्रिया आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाळवलेल्या मुळांची पावडर तयार करून तिचे योग्य पॅकिंग करून विक्री करता येते. या पद्धतीने तयार केलेल्या पावडरमध्ये रंग, पोत उत्तम राहते. त्यामुळे शेतकरी, बचत गट किंवा लघुउद्योजकांना शतावरीच्या प्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धनाची संधी तयार होऊ शकतात.

आवश्यक यंत्रसामग्री ः
शतावरीच्या मुळांवर प्रक्रिया करताना स्वच्छता, एकसारखी कापणी, ऑस्मोटिक प्रक्रिया आणि नियंत्रित वाळवण या बाबींना महत्त्व असते. त्यामुळे प्रक्रिया यंत्रसामग्रीची निवड महत्त्वाची ठरते. शतावरी मुळांच्या प्रक्रियेसाठी वॉशिंग टँक, कटर किंवा स्लायसर, ऑस्मोटिक टँक, ट्रे ड्रायर, पल्व्हरायजर आणि पॅकिंग मशीन यांसारखी यंत्रसामग्री आवश्यक असते. ही प्रक्रिया वैयक्तिक पातळीवर करणे शक्य असून नवउद्योजक लघुउद्योगाच्या स्वरूपात करणे शक्य आहे. यासह शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून मूल्यवर्धनाला चालना मिळू शकते. योग्य व आकर्षक पॅकिंग करून शतावरी पावडरची बाजारपेठेत विक्री केल्यास चांगले आर्थिक मूल्य मिळू शकेल.
--------------------
- डॉ. स्नेहल जाधव-कांबळे, ९७३०८४५९४७
(कृषी अभियांत्रिकी विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)

फोटो ः
शतावरी मुळांची पावडर. PNE26W55242
ऑस्मोटिक टँक PNE26W55237
ट्रे ड्रायर PNE26W55235
-------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com