ओतूर भागातील महिलांसाठी ‘दक्षता समिती’चे व्यासपीठ

ओतूर भागातील महिलांसाठी
‘दक्षता समिती’चे व्यासपीठ
Published on

ओतूर, ता. २९ : महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण आणि सुरक्षिततेसाठी ओतूर (ता. जुन्नर) पोलिस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली. पोलिस प्रशासन आणि महिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.
या समितीत वैद्यकीय, न्याय, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, सायबर गुन्हे आणि बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करणे, तसेच पीडितांना कायदेशीर मदत मिळवून देणे ही समितीची मुख्य उद्दिष्टे आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षण आणि कायदेविषयक प्रबोधनावरही समिती भर देणार आहे.
‘‘महिलांनी अन्यायाविरुद्ध न घाबरता तक्रार करावी, पोलिस प्रशासन त्यांच्या तक्रारींची गोपनीयता राखून कारवाई करण्यास कटिबद्ध आहे,’’ असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजगिरे यांनी केले. या समितीमुळे परिसरातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. या समितीत सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजगिरे, महिला पोलिस हवालदार रेश्मा फापाळे, डॉ. वैष्णवी ठिकेकर, छाया तांबे, अक्षदा पानसरे, रत्ना शिरसाठ, रंजना घोलप, ॲड. आरती नलावडे, शांताबाई कुटे, शबाना मोमीन, पूजा शिंदे, मीनाक्षी लाहोरकर, मीरा जगदाळे, संजीवनी हांडे आणि शिवानी पन्हाळे यांचा समावेश आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com