esakal | पदभरती रद्द केल्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

Candidate

पुणे : पदभरती रद्द केल्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये आक्रोश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून सर्वोपचार रूग्णालयातील (Sassoon General Hospital) महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची पदभरती (Recruitment) एक दिवस आधी रद्द केल्याने उमेदवारांमध्ये (Candidate) आक्रोश पाहायला मिळाला आहे. बहुतेक उमेदवारांना भरती प्रक्रिया रद्द झाल्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे गुरुवारी सकाळी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांना बुधवारची (ता. २८) ‘नोटीस’ (Notice) दाखविण्यात आली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांनी संस्थेच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. (Outrage among Candidates for Recruitment due to Cancellation of Recruitment)

संस्थेच्या आस्थापनावरील विविध रिक्त पदे भरण्यासाठी विभागीय निवड समितीच्या वतीने १४ व १६ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तिची मुलाखत व भरती प्रक्रिया गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र शासन कारणास्तव बुधवारी (ता. २८) प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यासंबंधीचे ई-मेलही उमेदवारांना पाठविण्यात आल्याचे संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत यांनी सांगितले. मात्र भरतीच्या आदल्या दिवशीच प्रक्रिया रद्द का झाली, उमेदवारांना आधी का कळविण्यात आले नाही, असा आक्षेप घेत उमेदवारांनी घेतला. नागपूर, नाशिक, सातारा आदी राज्याच्या विविध भागातून उमेदवार आले होते. सकाळपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारांनी डॉ. अभिवंत यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही हस्तक्षेप करत उमेदवारांची दखल घेतली.

हेही वाचा: खासगी शाळेचे 25 टक्के शुल्क कपात, पुणे जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

नागपूरहून सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी आलेला शशिकांत केंद्रे म्हणतो,‘‘संस्थेने पाठविलेला ई-मेल मला प्राप्त झाला नाही. आज मुलाखत व भरती प्रक्रिया असल्याने पदरचे खर्च करून कोरोनाच्या स्थितीत मी नागपूरहून इथे आलो. तर सकाळी भरती रद्द झाल्याचे सांगण्यात आले. आम्हाला या संबंधीचे स्पष्टीकरण हवे. यामुळे आम्हाला खूप मनस्ताप झाला आहे.’’ अचानक एक दिवस आधी भरती प्रक्रिया रद्द केल्याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. शेवटी डॉ. अभिवंत यांनी जबाबदारी घेत उमेदवारांना लेखी उत्तर दिले. त्यानंतर उमेदवार परतले.

राज्यभरातून दीड-दोनशे उमेदवार इथे सकाळपासून दाखल झालेत. त्यांना आधी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नाही. अचानक ही भरती प्रक्रिया रद्द का केली, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाने तातडीने द्यायला हवे होते.

- छगन ढाकणे, उमेदवार

भरती प्रक्रियेबाबत शासनाकडून विविध बाबी उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्या बाबी लक्षात घेता संस्थेचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या आदेशान्वये प्रक्रिया रद्द करण्यात आली. यासंबंधीचे परिपत्रक उमेदवाराच्या ई-मेलवरही पाठविण्यात आले आहे.

- डॉ. नितीन अभिवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे

loading image
go to top