डेपो बंद असूनही कचरा समस्येवर मात

सचिन कोळी
मंगळवार, 9 मे 2017

कात्रज - घराघरांत केलेले ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण, जादा वेळ देऊन कर्मचाऱ्यांनी केलेले नियमित कचरा संकलन आणि संकलित कचरा जिरवण्याच्या नियोजनामुळे गेले बावीस दिवस उरुळी कचरा डेपो बंद असूनही, त्याचा परिणाम चैतन्यनगर-धनकवडी प्रभागातील घनकचरा व्यवस्थापनेवर झाला नाही. सफाई कर्मचारी व आरोग्य अधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापनेतील आपली क्षमता व कौशल्य पणाला लावले आणि प्रभागातला कचरा प्रभागातच जिरवण्याचे आव्हान पेलले.

प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्यात यशस्वी ठरलेला पूर्वीचा प्रभाग क्रमांक चौतीस म्हणजेच चैतन्यनगरने ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियाना’त प्रथम क्रमांक पटकावला होता. नवीन प्रभागरचनेत चैतन्यनगर प्रभाग क्रमांक चौतीसला प्रभाग क्रमांक ६९ म्हणजेच धनकवडी गावाचा बहुतांश भाग आणि आंबेगाव पठारचा काही भाग जोडला गेला. 

चैतन्यनगरच्या मर्यादित भागातील घनकचरा व्यवस्थापनात यशस्वी ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी नव्याने जोडलेल्या भागातही कचरा संकलन करून तो जिरवण्याचे आव्हान स्वीकारले. आंबेगाव ग्रामपंचायत हद्द आणि लगतच्या आंबेगाव पठार परिसरातील आरक्षित जागा आणि खासगी मोकळ्या जागेवर पडणारा कचरा थोपवण्यासाठी जनजागृती करून त्या भागातील कचरा संकलनात धडाका वाढवला. दीड महिन्यात नियोजन यशस्वी होत असतानाच उरुळी देवाची आणि फुरसुंगीचा कचरा डेपो बंद झाला. समस्येऐवजी संधी समजून गेले बावीस दिवस प्रभागातील कचरा जोमाने उचलून तो जिरवण्यात आला. 

प्रभागात तब्बल एकवीस हजार मिळकती आहेत. त्यातून बत्तीस मेट्रिक टन कचरा दररोज निर्माण होतो. चार घंटा ट्रॅक्‍टर, दोन घंटा ट्रक, एक ई-टेंपो रिक्षा व चार कंटेनरच्या साहाय्याने नागरिकांकडील ओला व सुका कचरा संकलित केला जातो. संपूर्ण सुका कचरा कात्रजच्या प्रक्रिया केंद्रात पाठवला गेला. ओला कचरा अजिंक्‍य बायोटेक कंपनीला; तर हॉटेलमध्ये निर्माण होणारा ओला कचरा प्रभागाच्या बायोगॅस प्रकल्पाला देण्यात येतो. 
 
स्वच्छ प्रभागाची घोडदौड कायम
कचरा संकलनात डोकेदुखी ठरलेल्या साठ खासगी मोकळ्या जागामालकांना जागेभोवती पत्रे उभारण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीत राहणारे आणि महापालिका हद्दीत बेजबाबदारपणे कचरा फेकणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. सफाई कामाचा आढावा, अडचणींवर मात करण्यासाठी कर्मचाऱ्यांशी सुसंवाद आणि नवनवे प्रयोग करून चैतन्यनगरला घनकचरा व्यवस्थापनेत सक्षम करण्यात यशस्वी ठरलेले नगरसेवक विशाल तांबे यांनी नव्या विस्तारित प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छ प्रभागाची घौडदोड कायम ठेवल्याचे चित्र आहे.

Web Title: Overcoming the garbage problem even though the depot is off