

PNE26W64533
सोलापूर ः पद्मश्री मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, डॉ. शिवरत्न शेटे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी.
अरण्यऋषींच्या निसर्गसाधनेचा ठेवा आता नव्या पिढीसाठी खुला
पद्मश्री मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन; वेबसाइटचेही लोकार्पण, दुर्मिळ साहित्याच्या जतनातून संशोधकांना मिळणार दिशा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : जंगल, वन्यजीव, पक्षी आणि निसर्गातील अगणित रहस्यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या ज्ञानसंपदेचा वारसा आता संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला उपलब्ध होणार आहे. त्यांच्या भटकंतीतून संकलित झालेल्या दुर्मिळ नोंदी, पुस्तके आणि निसर्गविषयक संदर्भ साहित्याच्या जतनासाठी उभारलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी वेबसाइटचेही लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. चित्तमपल्ली यांनी आयुष्यभर निसर्गाचा शोध, अभ्यास आणि संवर्धनासाठी केलेले कार्य समाजाचा अमूल्य ठेवा आहे. नव्या पिढीला अभ्यासाची प्रेरणा मिळावी, संदर्भसाहित्य उपलब्ध व्हावे, हा ग्रंथालय उभारणीमागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे श्रीनिवास चित्तमपल्ली आणि श्रीकांत चित्तमपल्ली यांचे त्यांनी कौतुक केले.
पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून वेबसाइटचे लोकार्पण झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठ परिसरात वनराई फुलवून चित्तमपल्ली यांच्या स्मृती जतन करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी चित्तमपल्ली यांच्या भाषिक योगदानाचा गौरव केला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, विमलताई माळी, डॉ. लोकशाहीर शिवरत्न शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे, श्रीनिवास चित्तमपल्ली, श्रीकांत चित्तमपल्ली आणि राजकुमार हंचाटे उपस्थित होते.
चौकट
निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी चित्तमपल्लींनी दिली
इंद्रजित भालेराव यांनी चित्तमपल्ली यांच्या निसर्गसाधना आणि साहित्यिक योगदानाचा गौरव केला. निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करून त्यातील सौंदर्य, विविधता आणि जीवनाचे परस्परसंबंध समजून घेण्याची दृष्टी त्यांनी समाजाला दिली. या ग्रंथालयातून त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
------------
२५ हजारांची देणगी; कार्यकर्त्यांचे योगदान
विजयकुमार भोसले यांनी ग्रंथालयासाठी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. ग्रंथालय उभारणी व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय जोगीपेठकर, श्रद्धानंद नरवणे, गजानन होनराव, सुरेश येळमेली, सतीश नोमुल, राहुल म्हमाणे, सचिन पतंगे, काशिनाथ बिराजदार, शंकर गाडी आणि गुरुशांतप्पा ढगे यांनी परिश्रम घेतले. अश्विनी तडवळकर यांनी सूत्रसंचालन केले. शतावरी चित्तमपल्ली यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.