esakal | जय शिवराय : राजगडावर दुरुस्तीचं काम सुरू; पुरातत्व विभागानं घेतली दखल
sakal

बोलून बातमी शोधा

जय शिवराय : राजगडावर दुरुस्तीचं काम सुरू; पुरातत्व विभागानं घेतली दखल

- चक्रीवादळात उडालेल्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती देवीच्या मंदिरावरील पत्रे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात  

जय शिवराय : राजगडावर दुरुस्तीचं काम सुरू; पुरातत्व विभागानं घेतली दखल

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रिवादळाचा फटका किल्ले तोरणा व राजगड किल्ल्यावरील वास्तूंना बसला आहे. यासंदर्भात 'किल्ल्यांवरील वास्तूंना फटका' या मथळ्याखाली बातमी दैनिक 'सकाळ'मध्ये ८ जून रोजी बातमी प्रसिध्द होताच याची दखल पुरातत्व विभागाने घेत राजगड किल्ल्यावरील पद्मावती देवीच्या मंदीरावरील तत्काळ पत्रे बसविण्यास सुरुवात केली असून ५५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली आहे. याबाबत शिवप्रेमींनी 'सकाळ'चे आभार मानले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

निसर्ग चक्रीवादळाचा फटका वेल्हे तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला होता. यामध्ये नागरिकांच्या शेकडो घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे, तर सार्वजनिक इमारतींमध्ये  काही ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या काही शाळा व अंगणवाडी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर किल्ले राजगडावरील पद्मावती देवीच्या मंदिरावरील व किल्ले तोरणावरील नुतनीकरण केलेल्या दारूगोळा कोठार या वास्तूंवरील पत्रे उडाले होते. 

स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड 

ज्या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी स्वराज्यांची सत्तावीस वर्ष राज्यकारभार चालवला. या  किल्ल्यावरील पद्मावती माचीवर असलेल्या पद्मावती देवीचे  शिवकालीन मंदिर असून, कोणत्याही मोहिमेला जाताना व मोहिमेवरून आल्यानंतर शिवाजी महाराज या देवीचे आर्शिवाद घेत, तर आजही किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात, तर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात करत असतात. या शिवकालीन देवीच्या मंदिराचे काम जुने असून कोरीव लाकडात केले आहे. यामध्ये तुळ्या, उभे खांब, वासे, चौकट हे संपूर्ण लाकडात आहे. तर छतावर पत्रे टाकण्यात आले होते. तेच पत्रे उडाल्याने हे मंदिर उघडे पडले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वेल्हे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने मॉन्सून सक्रिय होण्याआधी यावर पत्रे टाकणे गरजेचे होते. नाहीतर या शिवकालीन मंदिर ही जुनी ऐतिहासिक वास्तू खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून वेल्हे तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे कामात अडचणी येत आहेत. तरीही या ठिकाणचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिरावरील सर्व पत्रे बसविले असून, यावरील ढापे बसविण्याचे काम बाकी आहे. ते दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक
 संचालक विलास वाहणे यांनी सांगितले. तर किल्ले तोरणावरील दारूगोळा कोठार या वास्तूचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले होते. यावरील पत्रे उडाले होते. यावरील सर्व लाकडे बाजूला ठेवली असून, हे काम पावसाळा संपल्यानंतर करण्यात येणार असल्याची  माहिती वाहणे यांनी दिली.
 

loading image