पळसदेवची ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल

पळसदेवची ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल

Published on

पळसदेवची ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल

इंदापूर तालुक्यातील पळसदेव हे गाव ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे गावचा चेहरामोहरा बदलला आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या व कधीकाळी उजनी धरणामुळे पुर्नवसन झालेल्या या गावाने विस्थापिताची कात टाकली आहे. गावातील सर्वांगिण विकास कामांमुळे गावची नव्याने ओळख समोर येत आहे.

- सचिन लोंढे, पळसदेव

पळसदेव ग्रामपंचायतीने गावातील पायाभूत सुविधा उभारण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले आहे. गतवर्षी गावाने सुमारे साडेपाच कोटींचा विकास आराखडा तयार केला होता. १५वा वित्त आयोग, नागरी सुविधा, जन सुविधा, ग्रामपंचायत फंड, लोकसहभाग व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनांतून गावात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, बंदिस्त गटार योजना, स्मशानभूमीचे सुशोभिकरण, पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीचे कामे, आरोग्य, शालेय, महिला बाल कल्याण आदी कामे करण्यात आली. याशिवाय ‘सुरक्षित पळसदेव’ संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. ग्रामदैवत पळसनाथ मंदिर, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही यंत्रणा सुरु केली आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर वॉटर हिटर यंत्रणा बसवून रुग्णांना गरम पाण्याची सोय केली. आवश्यक तेथे जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याबरोबर नादुरुस्त यंत्रणा कार्यान्वित केली आहे. याशिवाय ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. तसेच ग्रामस्थांच्या लोकवर्गणी व सहकार्यातून ग्रामदैवत श्री पळसनाथ मंदिर व सभामंडपाचे रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.
गावाचा विकास हा तिथल्या रस्त्यांवरून मोजला जातो. पळसदेवमधील अंतर्गत रस्ते जे अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होते, तिथे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजनबद्ध गटार व्यवस्था निर्माण केली आहे. गावातील ८० टक्के परिसरात गटार योजना पूर्ण झाली आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा होऊन गावातील आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
गावातील रेणुका माता मंदिर परिसर, काळेवाडी येथील प्राथमिक शाळा, शिंदेवस्ती येथील स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गरम पाण्याच्या सोईसाठी सौर वॉटर हीटर योजना कार्यान्वित केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर बसविण्यात आलेली सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याला रंगरंगोटी व स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे.
याशिवाय गावात वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा ग्रामस्थांनी विडा उचलला आहे. याशिवाय प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पळसनाथ मंदिर परिसरात विंधनविहीर खोदून त्यात विद्युतपंप बसवून मंदिरासाठी २४ तास पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. या सर्व कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवून, प्रत्येक काम गुणवत्तेच्या निकषावरच होईल, याकडे स्वतः सरपंच कोमल सुभाष बनसुडे यांनी लक्ष दिले आहे. शाळांच्या दुरुस्तीपासून ते स्मशानभूमीच्या सुशोभीकरणापर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांनी कामाची छाप पाडली आहे. त्यामुळे आगामी काळात पळसदेव हे तालुक्यातील एक आदर्श ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून नावरुपाला येईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com