पुणे - हडपसरहून सासवडला जाण्यासाठी आता केवळ वीस ते पंचवीस मिनिटांचा अवधी लागणार आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाणार आहे..राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढील पन्नास वर्षांचा या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीचा विचार करून तब्बल आठ मार्गिका तयार करीत आहे, तर दिवेघाटात दोन्ही बाजूने मिळून सहा मार्गिकेचे काम सुरू आहे. दिवेघाटात काम करणे आव्हानात्मक असले तरीही महामार्ग प्राधिकरणाने ही जबाबदारी लिलया सांभाळली आहे..श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हडपसर ते दिवेघाट हा टप्पा १३.२५ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर पूर्वी दोन मार्गिकेचा रस्ता होता. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. शिवाय आषाढीवारीच्या वेळी माऊलीच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांनादेखील अरुंद रस्त्यामुळे त्रास होत होता.पालखी मार्गाचे विस्तारीकरण करताना हडपसर ते दिवेघाट या टप्प्याचे काम काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा सुरू झाले. आता मात्र या कामाने प्रचंड वेग घेतला आहे. हा मार्ग दोन मार्गिकांवरून आठ मार्गिकांमध्ये रूपांतरित होत आहे. यात दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचादेखील समावेश आहे. सेवा रस्त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिक, दुकानदार, व्यापारी यांच्यासाठी हे अत्यंत सोयीचे ठरणार आहे..उड्डाणपूल, भुयारी रस्त्यामुळे वेळ वाचणारया मार्गावर मंतरवाडी ते साडी सेंटरदरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तर वडकी, उरुळी देवाची, फुरसुंगीसह अन्य एका ठिकाणी भुयारी रस्त्याचे (अंडरपास) काम सुरू आहे. शिवाय फुरसुंगी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे (आरओबी) विस्तारीकरण केले जात आहे. येत्या काही महिन्यांत याचे काम पूर्ण होणार आहे..पुरंदर विमानतळासाठी सोयीचा मार्गप्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. पुरंदर विमानतळ सुरू झाल्यावर या मार्गावरून पुरंदरला जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. शिवाय या मार्गावरून सोलापूर, पंढरपूरसाठीदेखील मोठी वाहतूक होणार आहे. चांगला रस्ता व रुंदीकरण झाल्याने हा प्रवास वेगवान तर होणारच आहे, शिवाय तो सुरक्षितदेखील असणार आहे. दिवेघातील तीव्र वळणेदेखील कमी करण्यात येत आहेत..हडपसर ते दिवेघाटदरम्यानचा हा टप्पा पालखी महामार्गाच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक आणि महत्त्वाचा आहे. सध्या आम्ही दिवेघाटातील अवघड वळणे कमी करणे आणि रस्ता रुंदीकरणासाठी डोंगराचा छोटे भाग कापण्याचे काम वेगाने करत आहोत. २०२६च्या पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गातील जास्तीत जास्त काम पूर्ण करून वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे.पूर्वी दोन मार्गिकांचा असलेला हडपसर-दिवेघाट पालखी मार्ग आता एकूण आठ मार्गिकांमध्ये विकसित केला जात आहे. आता सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम होण्यास आणखी किमान दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.- अभिजित औटे, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.