पाचगणी : पाचगणीत ‘चक्री’ जुगारावर पोलिसांचा छापा; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
चक्री जुगारप्रकरणी तिघांवर गुन्हा
पाचगणी पोलिसांची कारवाई; रोकडसह साहित्य जप्त
पाचगणी, ता. २२ : शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर ‘चक्री’ जुगारावर पाचगणी पोलिसांनी धडक कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी ४८ हजार ७७० रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पाचगणी परिसरातील हनुमान गल्लीतील आदर्श गल्ली येथे असलेल्या गाळा क्रमांक एकमध्ये बेकायदेशीररीत्या चक्री जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी चक्री जुगार खेळला आणि खेळवला जात असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्याचा मालक नवनाथ पाटील, विशाल ढाणे आणि जुगार चालवणारा अक्षय पेटेकर (रा. सदरबझार, सातारा) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगारासाठी लागणारे विविध साहित्य असा एकूण ४८ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशा समाजविघातक कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

