भोसे : पाचगणीच्या टेबल लँड रोडवर मृत्यूचा सापळा; सर्कल ऑफिससमोर लोखंडी जाळीची दुरवस्था, मोठ्या अपघाताची भीती

भोसे : पाचगणीच्या टेबल लँड रोडवर मृत्यूचा सापळा; सर्कल ऑफिससमोर लोखंडी जाळीची दुरवस्था, मोठ्या अपघाताची भीती

Published on

​पाचगणीत गटाराच्या जाळीचा धोका

टेबललँड रस्त्यावरील स्थिती; अपघाताची शक्यता, उपाययोजनांची गरज

भोसे, ता. २ : पाचगणी शहरात सध्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य पर्यटन केंद्र असलेल्या टेबल लँडकडे जाणाऱ्या मार्गावर, सर्कल ऑफिस कार्यालयासमोरच रस्त्यावरील गटाराची लोखंडी जाळी अपघातास निमंत्रण देत आहे. धोकादायक स्थितीत असलेली ही जाळी कोणत्याही क्षणी तुटण्याच्या अवस्थेत असून, त्यावरून दररोज शेकडो वाहने आणि पर्यटकांची ये-जा सुरू असते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​पाचगणीत येणारा प्रत्येक पर्यटक टेबललँडला भेट देतोच. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सर्कल ऑफिससमोर असलेल्या या गटारावरील जाळीचे लोखंड सडून कमकुवत झाले असून, ती पूर्णपणे दबली गेली आहे. अवजड वाहने या जाळीवरून जाताना मोठा आवाज होतो आणि जाळी अधिकच खचत चालली आहे. जर धावत्या वाहनाखाली ही जाळी अचानक तुटली, तर वाहनाचा टायर त्यात फसून भीषण अपघात होऊ शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते, कारण रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या अंधारात ही तुटलेली जाळी लक्षात येत नाही.
​केवळ वाहनेच नव्हे, तर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पादचारी आणि पर्यटक चालत असतात. अनेकदा लहान मुले खेळत असताना किंवा पर्यटक निसर्ग पाहात चालताना या जाळीवरून जातात. ही जाळी तुटून एखादा पादचारी त्यात पडल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार याकडे लक्ष वेधूनही अद्याप पालिकेने याची दखल घेतलेली नाही.

-------------------

पर्यटक, स्थानिकांचा इशारा

​पर्यटन हंगाम सुरू असल्याने पाचगणीत गर्दी वाढत आहे. अशा स्थितीत धोकादायक जाळी पर्यटनाच्या दृष्टीने घातक ठरू शकते. जाळी रस्त्याच्या खाली असल्याने खड्ड्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहने मोठ्याने या जाळीवर आदळत आहेत. पालिकेने धोकादायक जाळी तातडीने बदलून त्याठिकाणी मजबूत नवीन जाळी बसवावी किंवा कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, येथे होणाऱ्या कोणत्याही अपघाताला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पर्यटक व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

----------------------------
07064, 07066
पाचगणी : येथे रस्त्याच्या मधोमध वाहनांसाठी धोकादायक ठरत असलेली जाळी. (रविकांत बेलोशे : सकाळ छायाचित्रसेवा)

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com