

PNE26W65972 सोलापूर ः उपनयन संस्कार सोहळ्यात सहभागी ८० बटू
PNE26W65971 - श्रीमज्जिनेंद्र भगवान आदिनाथांच्या याच जिनबिंबांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ झाला
गर्भकल्याणक संस्कार अन् उपनयन सोहळा
कुमठ्यात पंचकल्याणक महोत्सवास अयोध्यानगरीत मंगलारंभ; उद्या यात्री भवनाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता.१५ : जैन धर्मात तीर्थंकर भगवंतांच्या जीवनातील गर्भधारणेपासून ते मोक्षप्राप्तीपर्यंतच्या पाच पावन घटनांचे स्मरण पवित्र मानले जाते. यासोबतच आत्मिक उन्नती साधण्यासाठी ''पंचकल्याणक'' महोत्सव अत्यंत श्रद्धाभावाने केला जातो. याच धार्मिक आणि अध्यात्मिक महोत्सवाला कुमठे येथे प्राचीन चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरानजीक चैतन्यपूर्ण वातावरणात रविवारी प्रारंभ झाला.
परमपूज्य सुप्रभसागर महाराजांच्या दिव्य सानिध्यात साकारलेल्या ''अयोध्या नगरी''त श्रीमज्जिनेंद्र आदिनाथ भगवानांच्या सात जिनबिंबांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी गर्भकल्याणक संस्कार विधिवत पार पडले. भगवंतांचे माता-पिता होण्याचा बहुमान विजयकुमार शहा परिवाराला मिळाला. मंगळवारी (ता.१७) सविशुद्ध यात्री भवनचे भूमिपूजन होणार आहे. या महोत्सवाला सोलापूरसह धाराशिव, लातूर आणि गुलबर्गा येथून आलेले सुमारे एक हजार जैन समाजबांधव-भगिनी उपस्थित होते. मोक्षमार्गासाठी धर्मकार्य व सेवा करण्याचा संदेश मुनिश्री सुप्रभसागर महाराज यांनी दिला.
--------------------------------------------------
मध्यप्रदेशातील प्रतिष्ठाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलविधी
सकाळी मध्य प्रदेशातील रामगडा येथील पंडित प्रतिष्ठाचार्य मुकेश शास्त्री व प्रतिष्ठाचार्य अखिलेश शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात भगवंतांचा अभिषेक झाला. त्यानंतर मुनिश्रींकडे महोत्सवाला सानिध्य देण्याची आर्त विनंती झाली. यानंतर सर्वोत्तम द्रव्य मानल्या जाणाऱ्या २१ कलशांची मंगलयात्रा जैन मंदिर ते एसपीएम कॉलेजमार्गे निघून महोत्सवाच्या मुख्य कार्यस्थळापर्यंत म्हणजेच ''अयोध्या नगरी''त पोहोचली. या अयोध्या नगरीत ध्वजारोहणाचा मान डॉ. श्वेता शहा परिवाराला मिळाला, तर मंडप उद्घाटनाचा मान श्रीधर पाटील यांनी भूषवला.
--------------------------------------------------
याग मंडल विधान आणि यज्ञास प्रारंभ
याग मंडल विधानाला प्रारंभ होताना १७ इंद्र-इंद्राणी यांच्या हस्ते पूजन झाले. दुसऱ्या बाजूला विधिवत यज्ञास सुरुवात झाली. सलग सहा दिवस हा यज्ञ चालणार आहे. पहिल्या दिवसाच्या सत्रात मुख्य गर्भकल्याणक संस्कारांतर्गत भगवंतांना विधिवत गर्भात स्थापित करण्याचा सोहळा भक्तिभावाने पार पडला. दुपारी एक वाजता परमपूज्य सुप्रभसागर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ८० जणांचा उपनयन संस्कार सोहळ्यात बटूंना सप्तव्यसनांचा त्याग व नित्य देवदर्शन करण्याचा मोलाचा उपदेश देण्यात आला. सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने आणि मंगलारतीने पहिल्या दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची मंगल सांगता झाली. राम पाटील परिवारातर्फे सेवा म्हणून केलेल्या भाजी, चपाती, भात, आमटी आणि जामुन असा अस्सल सात्त्विक महाप्रसादाचा हजारो भाविकांनी ग्रहण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.