सकाळ वृत्तसेवा पंढरपूर दि.3 मार्च पंढरपूरात कॉरिडॉर विरोधात उस्फुर्त बंद व प्रचंड मोर्चा...(फोटो घेणे)
PDR26B09453
पंढरपूर : महाद्वारातील नामदेव पायरी येथे प्रस्तावित कॉरिडॉरविरोधी मोर्चात सहभागी नागरिक.
---
कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद
तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा; ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३ : पंढरपूर मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी (ता. २) पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिर परिसरातील बाधित नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
महाद्वारातील नामदेव पायरी येथे माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज आदींच्या हस्ते पूजन करून मोर्चाला सुरवात झाली. ‘एकच जिद्द - कॉरिडॉर रद्द’, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती की, शहरात वापराविना पडलेल्या शासकीय जागा तसेच अतिक्रमित जागांवर कॉरिडॉरसारखे प्रकल्प राबवावेत. वारकरी बांधवांना सुविधा देणारी बाधितांची घरे पाडू नयेत आणि कॉरिडॉर सरकारी जागांवरच उभारावा.
मोर्चा तहसील कार्यालयाकडे जात असताना विविध चौकांमध्ये भाषणे झाली. शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात मोर्चा तहसीलदार कार्यालयात पोचला. यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, नगरसेवक राहुल शिंदे, नाईक किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज आदींनी आपली मते मांडली. मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. वट्टमवार ताई, डॉ. प्राजक्ता बेणारे, सौ. बिडकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
कॉरिडॉरविरोधात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद व महामोर्चा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बाधित भागासह शहरातील विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात कॉरिडॉरसाठी तरतूद होण्याची चर्चा असताना, पंढरपुरातून मोठा विरोध उभा राहिल्याचे चित्र दिसून आले.
मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नानासाहेब कवठेकर, नगरसेवक ओंकार जोशी, रा. पां. कटेकर यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गणेश लंके, वैभव बडवे, अनिल गवळी, प्रशांत खंडागळे, यशवंत बेणारे, उंडाळे वकील आदींनी परिश्रम घेतले.
---
‘चंद्रभागेच्या पैलतीरावर कॉरिडॉर उभारावा’
कॉरिडॉरविरोधी मोर्चात सहभागी झाल्यानंतर आमदार अभिजित पाटील म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही; मात्र हजारो लोकांचे विस्थापन करून घरे पाडण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. कॉरिडॉर उभारायचाच असेल तर चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारावा. तेथे पूल बांधून भाविकांना दर्शनासाठी सोयीस्कर व्यवस्था करता येईल आणि मंदिर परिसरातील नागरिकांची घरे पाडावी लागणार नाहीत.
---
‘बाधितांवर अन्याय होणार नाही’
कॉरिडॉर बाधितांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. प्रशासनाशी अनेक वेळा संवाद झाला आहे. प्राथमिक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यात आवश्यक बदल अपेक्षित आहेत. कोणत्याही परिस्थितीत बाधितांवर अन्याय होणार नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी करावे, असे आमदार समाधान आवताडे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

