

कॉरिडॉर बाधितांसाठी पंढरपुरात
भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित मालमत्ताधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ यांचे तात्पुरते कार्यालय आता पंढरपुरातच सुरू करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास येथे हे कार्यालय सुरू होणार असून, दर आठवड्याला मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी तेथे कामकाज चालेल. या निर्णयामुळे बाधितांना आता प्रत्येक कामासाठी सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पासाठी जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असून, बाधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत बाधितांनी आपले म्हणणे किंवा आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे. मालमत्ताधारक स्वतः, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत भक्त निवास येथील कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडू शकतात. बाधित जमिनीचे क्षेत्रफळ व तपशील, वास्तू, मालमत्तेचा वापर, हितसंबंधांचे स्वरूप, अपेक्षित नुकसानभरपाईची रक्कम, दाव्याचे पुरावे व हिश्शाबाबतची माहिती सादर करावी लागेल. जमिनी अथवा मालमत्तेसंदर्भात काही हरकती किंवा आक्षेप असल्यास बाधितांनी दिलेल्या निर्धारित मुदतीतच पंढरपूर येथील कार्यालयात नोंदवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.