पंढरपुरात निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; दोन लाख 85 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
पंढरपूर तालुका
३०९ मतदान केंद्रांवर १७०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आठ जि.प. गट अन् १६ गणांसाठी मतदान;
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ५ ः पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी (ता.७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनद्वारे मतदान होणार आहे. तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील २ लाख ८५ हजार ८२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात कासेगाव येथील निकमवस्ती हे एकमेव संवेदनशील मतदान केंद्र जाहीर करण्यात आले आहे, माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी आज दिली.
तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ३०९ कंट्रोल युनिट व ४०८ बॅलेट युनिट संच तयार करण्यात आले आहेत. तसेच ६४ कंट्रोल युनिट व ११६ बॅलेट युनिट संच राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदानयंत्राच्या सुरक्षेसाठी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई अशा १ हजार ७०० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या (ता. ६) सकाळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे मतदान पथकांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. साहित्य वाटपासाठी २२ टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
तालुक्यात वाखरी येथील मतदान केंद्र क्रमांक १५८ हे आदर्श महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. टाकळी येथील मतदान केंद्र क्रमांक २४० येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच कासेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २८५ (निकम वस्ती) हे मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र असून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-------
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात
तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. या मध्ये पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी असा सुमारे ५०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
----
तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणासाठी उद्या मतदान होणार आहे.
जिल्हा परिषद गट- कासेगाव, गोपाळपूर, टाकळी, भाळवणी, वाखरी, भोसे, करकंब, रोपळे
पंचायत समिती गण- कासेगाव, सरकोली, गोपाळपूर, पुळूज, टाकळी, खर्डी, भाळवणी, पळशी, वाखरी, पटवर्धन कुरोली, भोसे, गुरसाळे,करकंब, उंबरे, रोपळे, सुस्ते.
एकूण मतदार- २ लाख ८५ हजार ८२७
मतदान केंद्रे- ३०९
संवेदनशील मतदान केंद्रे -१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

