एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकच केंद्र सुरू केल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय... ग्रामीण भागात केंद्र सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकच केंद्र सुरू केल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय... ग्रामीण भागात केंद्र सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

Published on

PDR26B09468
पंढरपूर : स्मार्ट कार्ड नोंदणी करण्यासाठी जुन्या बसस्थानकामध्ये झालेली नागरिकांची गर्दी.

पंढरपुरात एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी एकच केंद्र

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; ग्रामीण भागात केंद्र सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
..........
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा.
पंढरपूर, ता. ६ : एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाने आता एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक केले आहे. त्याकरिता येथील एसटीच्या जुन्या बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील लाखो लाभार्थ्यांसाठी एकच केंद्र सुरू केल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख गावांमध्ये आणखी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विविध योजना सरू केल्या आहेत. यामध्ये ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षावरील नागरिक व सर्व वयोगटातील महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत तसेच विद्यार्थी व दिव्यांग यांना तिकीट दरात सवलत दिली आहे. मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता एसटीचे स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी केल्यानंतर एक महिन्याने प्रवाशांना कार्ड मिळणार आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरल क्रमांकाशी जोडलेले स्मार्ट कार्ड तर अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना अंतर्गत प्रवास करणाऱ्या लाभार्थ्यांना आधार संलग्न कार्ड मिळेल. याशिवाय दिव्यांग, दृष्टिहीन नागरिकांना युडीआयडी क्रमांकाशी संलग्न असलेले विशेष कार्ड दिव्यांगांना देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येथील जुन्या बसस्थानकामध्ये २४ फेब्रुवारी रोजी एक खिडकी केंद्र सुरू करण्यात आले असून अद्याप पर्यंत फक्त ५६८ स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यात आली आहे. एकच केंद्र सुरू असल्याने पंढरपूर शहर तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख गावांमध्ये आणखी केंद्र सुरू करावीत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

चौकट
कागदपत्रांचा फलक लावण्याची मागणी
स्मार्ट कार्ड केंद्राच्या ठिकाणी स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच संपूर्ण प्रक्रियेची माहिती असणारा कोणताही फलक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रक्रियेचा तसेच आवश्यक कागदपत्रांचा फलक लावावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

कोट
मी एसटी महामंडळाच्या अमृत योजना सवलतीचा लाभार्थी असून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी जुन्या बसस्थानकातील केंद्रावरती आलो होतो. मात्र या केंद्रावर एकच व्यक्ती स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करत असल्याने विलंब लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने ग्रामीण भागात आणखी केंद्र सुरू करावे अशी आमची मागणी आहे.
- नागनाथ गेना शिंदे, चिलाईवाडी, (ता. पंढरपूर)

कोट
एसटी प्रशासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील खर्डी, तुंगत, भाळवणी, सुस्ते अशा प्रमुख गावांमध्ये आणखी केंद्रे सुरू करावीत त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.
- योगेश लिंगायत, आगारप्रमुख, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com