पंढरपूर-विजयपूर रेल्वेमार्गाबाबत राजकीय अनास्था, खासदार शिंदे कडून दुर्लक्ष
पंढरपूर ते विजयपूर रेल्वेमार्ग राजकीय अनास्थेमुळे प्रलंबित
खासदार प्रणिती शिंदेंचेही दुर्लक्ष; मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना आशा
मंगळवेढा, ता. २६ : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला. मात्र राजकीय अनास्थेमुळे अद्यापही रखडला. वडिलांच्या काळात प्रस्तावित झालेला रेल्वेमार्ग मुलीच्या (खा. प्रणिती शिंदे) काळात तर मार्गी लागेल का? असा प्रश्न तालुक्यातून विचारला जात आहे.
पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी १२९४ कोटीचा पंढरपूर-विजयपूर हा १०८ किमीचा रेल्वेमार्ग २०१४-१५ मध्ये मंजूर केला. त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने निधीच दिला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर खा. शरद बनसोडे व खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून केंद्रात सत्ता असताना देखील म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. स्व. भारत भालके यांनी पंतप्रधान केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी उत्तर देत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित रेल्वे बोर्ड संचालकाला पत्राद्वारे कळविले होते. त्यांच्या निधनानंतर विद्यमान आ.समाधान आवताडे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे देखील समक्ष भेटून पत्र व्यवहार केला. दोन वर्षे झाले खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नावर अद्याप जोर धरला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे अंतर व खर्च, वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे. विजयपूर-पुणे हे अंतर ३७४ किमी आहे. मात्र, हा रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर ३१४ किमी होऊन ६० किमी अंतराची बचत होणार आहे.
---------
राजकीय इच्छाशक्तीची गरज
सुमारे एक हजार कोटी खर्च या रेल्वेमार्गासाठी विजयपूर लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा झाला. तसा पाठपुरावा सोलापूरातील खासदार, आमदारांनी केल्यास आणखी गती मिळू शकते. या मार्गाचे अंतर १०८ किमीऐवजी जवळपास ८५ किमी इतके होत असून त्याचा खर्च एक हजार कोटी आसपास होऊ शकतो. त्यासाठी पंढरपूर फलटण व कोकण रेल्वेप्रमाणे राज्य शासनाने यामध्ये आर्थिक हातभार लावला तर हा प्रश्न मार्गी लावू शकतो, असे मत रेल्वेशी अधिकाऱ्याने व्यक्त केले. मात्र, यासाठी गरज आहे, ती राजकीय इच्छाशक्तीची.
-------
MGV26B15457
दोन महामार्गामुळे मंगळवेढा तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर आले. भविष्यात रेल्वेचा प्रश्न मार्गी लागल्यास या भागातील दळणवळण वाढण्यास मदत होणार आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न मार्गी लागला नाही. दुर्दैवाने यापूर्वीच्या दोन खासदारांनी लक्ष घातले नाही. खा. प्रणिती शिंदे यांनीही दोन वर्षांत यात म्हणावे तसे लक्ष घातले नाही. उर्वरित कालावधीत हा प्रश्न त्या मार्गी लावतील अशी आशा आहे.
- अंकुश शेवडे, नागरिक, मंगळवेढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

