

विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती; घेतला सविस्तर आढावा
ॲग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर : तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी (ता.१५) मध्यरात्री १ वाजता घटनास्थळी भेट देऊन शोधकार्याचा सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली अडकले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल तसेच संबंधित बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेत रांझणी येथील सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे दोन कामगार मृतावस्थेत आढळून आले, तर अनवली येथील अन्य दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.
पालकमंत्री गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी विहिरींची कामे सुरू आहेत. यामध्ये परवानगी घेऊन सुरू असलेल्या तसेच विनापरवाना खोदण्यात येणाऱ्या विहिरींची माहिती प्रशासनाने संकलित करावी. सर्व विहीर खोदकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लारवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----चौकट------
परवानगीची चौकशी होणार
विहीर खोदकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का, ब्लास्टिंग करण्यास परवानगी होती का, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता अशा प्रकारे काम सुरू असेल, तर ती गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.