संगीतात व्याधी निवारणाची क्षमता - डॉ. श्री बालाजी तांबे

संगीतात व्याधी निवारणाची क्षमता - डॉ. श्री बालाजी तांबे

पुणे - ‘‘सध्या जिकडे तिकडे करमणूकप्रधान चाललेले आहे; परंतु शास्त्रीय संगीतात वेगळाच आनंद असतो. आपल्या जीवनाच्या वाहनव्यवस्थेच्या मुळाशी वेद आहेत आणि वेद संगीताशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. विशिष्ट ताल व रागात ध्वनी असल्यास शरीरात व्याधीच्या ठिकाणी पोचून बरे वाटायला मदत होते,’’ असे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य  डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सांगितले. 

‘गानवर्धन’ संस्थेतर्फे ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर व त्यांच्या पत्नी ज्येष्ठ गायिका पंडिता पद्मा तळवलकर यांना डॉ. तांबे यांच्या हस्ते नारायणराव टिळकपुरस्कृत ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पन्नास हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तळवलकर दांपत्याचे पुत्र तबलावादक सत्यजित, कन्या तबलावादक सावनी, सून शास्त्रीय गायिका सायली, जावई सिंथेसायझरवादक अनय गाडगीळ अशा या परिपूर्ण सांगीतिक कुटुंबाच्या गौरवसोहळ्यास दर्दी रसिकांनी दाद दिली. 

सत्काराला उत्तर देताना तळवलकर म्हणाले, ‘‘संगीत हे आत्म्याला विकसित करते. संगीत नुसतेच शिकवणारे पुष्कळ असतात. मात्र आमच्या गुरूंनी आम्हाला शिकविण्यापलीकडे जाऊन घडवले. तोच वसा आम्ही  पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

या प्रसंगी कार्तिकस्वामी दहिफळे या युवा तबलावादकाला संगीता मसुरेकरपुरस्कृत ‘प्रसन्नकुमार भद्रे स्मृती’ पुरस्कार तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ‘गानवर्धन’चे संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राडकर यांनी स्वागत केले. प्राची घोटकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. नारायण टिळक, त्यांच्या कन्या गायिका आलापिनी जोशी व सहप्रायोजक रमेश मराठे उपस्थित होते. सविता हर्षे यांनी सूत्रसंचालन केले. 

वादन अन्‌ गायनाची रंगली मैफील
सुरुवातीला पं. तळवलकर यांचे शिष्य आशय कुलकर्णी यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी तीनतालातील बहारदार प्रस्तुती केली. उत्तरार्धात सायली तळवलकर यांनी दमदार गायनाने मोहून घेतले. राग श्रीमधील ‘हरी के चरणकमल’ ही झपतालातील बंदिश सादर केल्यानंतर ‘सांझ भई आयो’ ही द्रुत रचना व तराणा पेश केला. त्यांना अभिषेक शिनकर (हार्मोनियम) व आशय कुलकर्णी (तबला) यांनी साथ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com