पांगरी जि.प.मतदारसंघात राजकीय रंगत वाढली,इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
पांगरी जि.प. मतदारसंघात वाढली राजकीय रंगत
सोपल-राऊत गटांत जोरदार रस्सीखेच; इच्छुकांची मोर्चेबांधणी
सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. १८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच, बार्शी तालुक्यातील पांगरी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागल्याने इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, हा मतदारसंघ तालुक्यातील प्रतिष्ठेचा ठरत आहे.
मागील निवडणुकीत या मतदारसंघावर आमदार दिलीप सोपल यांचे वर्चस्व होते. मात्र यावेळी पांगरी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत तयारी सुरू केली आहे. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मतदारांशी थेट संपर्क यावर भर देण्यात येत आहे. दुसरीकडे, आमदार सोपल यांनीही मतदारसंघ कायम राखण्यासाठी योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, दोन्ही गटांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
पांगरी जि.प. मतदारसंघातून राऊत गटाकडून सविता अनिल पाटील व पांढरी येथील पल्लवी बालाजी घावटे हे प्रमुख इच्छुक मानले जात आहेत. तर सोपल गटाकडून कारी येथील मीना मोहन विधाते, सीमा रामचंद्र शेळके व प्रेमल विलास जाधव यांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी येथे राजेंद्र राऊत यांनी पांगरी मतदारसंघातील इच्छुकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून, अधिकृत उमेदवार कोण असेल, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटी निवडणुकीत राऊत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने चेअरमनपद पांगरीचे विजय गरड यांना दिल्याने पांगरी भागात राऊत गटाला बळ मिळाले आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर राऊत समर्थकांमध्ये उत्साह वाढला असून, त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील निवडणुकीत आमदार सोपल यांनी पांगरी जिल्हा परिषद गट, पांगरी पंचायत समिती व कारी पंचायत समिती गण अशा तिन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी माजी जि.प. सदस्या रेखा राऊत यांची जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण व कृषी समितीवर वर्णी लागली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीतही त्याचा लाभ कसा होईल, याबाबत नियोजन केले जात आहे.
दरम्यान, आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. विकासाच्या मुद्द्यांवर भर देत दोन्ही नेत्यांनी आपापली रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
पांगरी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. पांगरी पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी असून, राऊत गटाकडून शरद बसवंत तर सोपल गटाकडून बळिराम बगाडे यांची नावे चर्चेत आहेत.
---
चौकट
प्रतिष्ठेच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष
पांगरी मतदारसंघ हा बार्शी तालुक्यातील महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जातो. सोपल व राऊत या दोन दिग्गज नेत्यांच्या ताकदीची पुन्हा एकदा कसोटी येथे लागणार असून, कोणता गट आपले वर्चस्व कायम राखतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

