पानशेत धरण शंभर टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले.

पुणे -  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले, तर मुळशी धरणात ९३ टक्के, ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत २० हजार ६९१ क्‍युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय मुळशी धरणातून बारा हजार ५३१ क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला : पानशेत धरण शुक्रवारी १०० टक्के भरल्यामुळे या धरणात अतिरिक्त होणारे ९८९२ क्‍युसेक पाणी धरणातून सोडले. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. 

 पानशेत धरणातून सकाळी नऊ वाजता १९८० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर ३४२६, ४५५१ व ९८९२ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविला. दरम्यान, सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत पानशेत येथे ५४ मिलिमीटर पाऊस झाला. 

धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता १३९८१ क्‍युसेक होता. तो सकाळी अकरा वाजेपर्यंत कायम होता. त्यानंतर तो अकरा वाजता १६२४७ क्‍युसेक करण्यात आला. रात्री ८ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेकपर्यंत वाढविला. दरम्यान, पानशेतमधून सोडलेले १० हजार क्‍युसेक थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. 

नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा 
पावसाचा जोर आणि खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील विसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे धोका निर्माण झाल्यास त्या-त्या भागांतील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ०२०- २५५०१२६९ आणि ०२०- २५५०६८००/१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविले आहे. 

‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के साठा
आंबेठाण : भामा आसखेड धरण ९७.५३ टक्के (७.९ टीएमसी) भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजांतून २११८ क्‍युसेकने भामा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरण लवकर भरले आहे. 

धरण परिसरात एक जूनपासून १००१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ८४.३७ टक्के पाणीसाठा झाला होता. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अवघ्या आठच दिवसांत धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून विसर्ग आणखी वाढू शकतो, असे धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panshet dam filled with a hundred per cent