पॅराशूटची चित्तथरारक प्रात्यक्षिके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वरवंड - वरवंड (ता. दौंड)  येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या कडकडात व जल्लोष करीत त्या बहादूर जवानांना भरभरून दाद दिली. 

वरवंड - वरवंड (ता. दौंड)  येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या कडकडात व जल्लोष करीत त्या बहादूर जवानांना भरभरून दाद दिली. 

शालेय जीवनातच मुला-मुलींशिवाय इतर तरुणांना सैन्यदलात जाण्याची दांडगी इच्छाशक्ती निर्माण व्हावी. या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्यदलातील आर्मी ऑनर्स कॉर ग्रुप (सिकंद्राबाद) कडून देशातील काही राज्यांत जाऊन विद्यालय, महाविद्यालयातील प्रांगणात पॅराशूट उड्डाणची प्रात्यक्षिके दाखविली जात आहे. मंगळवारी (ता. ११) वरवंड येथील श्री नागनाथ विद्यालयातील प्रांगणात या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी बारा वाजता गावात आर्मीच्या मेजर अमित जगदाळे, मेजर कृष्णा मजिरा, मेजर अरुण बोराडे, मेजर विजय सिंग या चार अधिकाऱ्यांसह एकवीस जवानांचे मोठ्या दिमाखात आगमन झाले. ग्रामस्थांतर्फे सैनिकांचा फेटा घालून सन्मान करण्यात आला. या वेळी सैनिकांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सैनिक होते. मराठी लोकांचे प्रेम पाहून जवान अक्षरशा भारावून गेले. या वेळी मेजर अमित जगदाळे, सुभेदार विजय सिंग यांनी विद्यार्थ्यांना लष्कराविषयी माहिती दिली. सैन्यदलात मुलांप्रमाणे मुलींना खूप संधी आहे. कोणत्याही क्षेत्रात गेले, तरी अभ्यास व कष्टाशिवाय पर्याय नाही. जास्तीतजास्त तरुणांनी सैन्यदलात भरती व्हावे, असे आवाहन मेजर जगदाळे यांनी केले. युद्ध काळात पॅराशूट माध्यम किती महत्त्वाची भूमिका बजावते. ते कशा पद्धतीने असते. याविषयी मेजर विजय सिंग यांनी सांगितले. 

प्रांगणात जवानांनी आपल्या खास शैलित पॅराशूट उड्डाणांची प्रात्यक्षिके दाखविण्यास सुरुवात केली. डोळ्यांसमोर लष्कराच्या वर्दीतील रुबाबदार जवान व त्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सर्वांसाठी पर्वणी ठरली. एका जवानाने अंगाला पॅराशूट बांधून पहिले उड्डाण घेताच सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटासह जल्लोष केला. जवानांसोबत सेल्फी काढण्याचा अनेकांना मोह आवरता आला नाही. गावातील काकडे परिवाराकडून जवानांसाठी मोरया गणेश मूर्तीची प्रतिमा भेट देण्यात आली. मेजर अरुण बोराडे, कुणाल दिवेकर, अमोल बारवकर, विजयसिंह परदेशी आदी गावातील आर्मीतर्फे या  कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

मेजर अमित जगदाळे, मेजर कृष्णा मजिरा, मेजर अरुण बोराडे, पोलिस पाटील किशोर दिवेकर, डॉ. अशोक पाटील, संजय दिवेकर, विजय दिवेकर, प्राचार्य अनिल दिवेकर, मनोज सातपुते, गुणाजी रणधीर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parachute Demonstration Army Jawan