जुन्या वस्तूंमधून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

जुन्या वस्तूंमधून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
Published on: 

आळेफाटा, ता. १५ : राजुरी (ता. जुन्नर) येथे पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पंधरा वर्षांपासून ते शंभर वर्षांपूर्वीच्या शेतीची अवजारे, घरगुती साहित्य, ग्रामीण वाद्ये आणि दुर्मीळ वस्तूंचे जतन व संवर्धन केले जात आहे. ग्रामीण संस्कृतीचा अनमोल वारसा जपणारे हे वस्तुसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, आतापर्यंत राज्यभरासह ३० हून अधिक देशांतील पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
वस्तुसंग्रहालयातील अनमोल ठेव्यामध्ये बैलगाडीची चाके, कोळपे, कुळव, पाभार, नांगर, जाडी, शिवळ, गोफण, लाकडी नक्षीदार चाडी, गवताचे ओझे बांधण्यासाठी वापरला जाणारा लाकडी मनी, छोटी मोट, बैलांच्या घुंगरमाळा, गोंडे आणि मुसकी अशा शेतीशी संबंधित अनेक वस्तूंचा समावेश आहे.
पूर्वी ग्रामीण घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काठवट, पोळपाट-लाटणे, ताक घुसळण्याची रवी, शेवया करण्याचा पाट, उखळ-मुसळ, पाटा-वरवंटा, भेंड्याच्या विटा तयार करण्याचे विटाळे तसेच शंभर वर्षांपूर्वीचा कुरडया बनविण्याचा सोऱ्या अशा वस्तूही येथे जतन केल्या आहेत. याशिवाय टिमकी, चिपळ्या, लेझीम, डफ आणि हलगी यांसारखी पारंपरिक ग्रामीण वाद्येही पर्यटकांना पाहायला मिळतात.

दुर्मीळ वस्तूंचे आकर्षण
या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळातील मेकअप बॉक्स, सुबक नक्षीकाम असलेला शंभर वर्षांपूर्वीचा कुरडईचा सोऱ्या, बारकाव्यांनी सजलेली पेरणीची चाडी आणि नक्षीदार शेवया बनविण्याचा पाट अशा वस्तूंचा संग्रह आहे. याशिवाय कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया आणि देशी बियाण्यांचे जतन करण्यासाठी छोटी सीड बँकही उभारण्यात आली आहे.

पर्यटकांसाठी संग्रहालय ज्ञानवर्धक
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील पर्यटकांसाठी हे संग्रहालय ज्ञानवर्धक ठरत आहे. विशेष म्हणजे परदेशातील पर्यटकही भारतीय ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक शेतीपद्धती समजून घेण्यासाठी आवर्जून येथे भेट देतात. जुन्या वस्तूंचे महत्त्व जाणणारे नागरिक आपल्या घरातील दुर्मीळ वस्तू संग्रहालयासाठी देत असल्याने या संग्रहात सातत्याने भर पडत आहे.


भविष्यात ग्रामीण वस्तुसंग्रहालयाची व्याप्ती आणखी वाढवून अधिकाधिक दुर्मीळ वस्तूंचे जतन व संवर्धन करण्याचा मानस आहे. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून होत आहे.
- मनोज हाडवळे, संचालक, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र

09107

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.