अहंकाराचा वारा

अहंकाराचा वारा
Published on

अहंकाराचा वारा...
.......................
शाळेच्या वाटेवरील दोन जगं
.......................
डॉ. वर्षा खोत
......................
मत्सर व द्वेष यामुळे लाभ नसून जिवाला दुःख होते. समाजात इतरांना दाखविण्यासाठी किंवा मत्सरापोटी ऐपत नसताना आपल्या पाल्याला महाग शाळेत घालणारे पालक अहंकाराचेच बळी आहेत.
......................
दोन छोटी शाळकरी मुले पावसात चिंब भिजत सायकल वर निघाली होती. मागे बसलेला मुलगा त्याचा शर्ट चिखलाने माखला होता, तर पुढचा मुलगा पावसाचा मारा झेलत मित्राला मागे बसवून सायकल नेटाने चालवत होता. रेनकोट नाही, टोपी नाही, अखंड भिजत घरी निघाले होते. त्यांच्या बाजूने एक शाळेची स्पेशल बस जात होती. या दृश्याला मी मागून न्याहाळत होते.
येणाऱ्या बिकट परिस्थितीला सामोरे जात शिक्षणासाठी संघर्ष करणारी सायकलवरील मुले आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षित कवचात वाढणारी स्पेशल बस ने शाळेला जाणारी मुले. दोन्हींचा विचार केला तर फरक आहे आर्थिक विषमतेचा व परिस्थितीचा! एका बाजूला पालकांची हतबलता तर दुसऱ्या बाजूला काळजी!

अतिश्रीमंतांची मुले शिकण्यासाठी विशेष शाळा-कॉलेज दिसत आहेत. तेथील अवाढव्य फी, दिमाखदार हॉस्टेल, टिव्ही, फ्रीजपासून जीमपर्यंतच्या सर्व सोयींनी संपन्न राहण्याच्या सुविधा. प्रत्येकास पैशाचा वापर आपल्या सुविधांसाठी करण्याचा हक्क आहे, असे असले तरीही अशा विशेष शाळांत वाढणारी मुले त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करू शकतात का? की त्याची गरज नाही? सामाजिक मूल्यांची जाणीव ठेवून वागण्याचा संस्कार यांच्यावर किती घडतो? असे प्रश्न आहेतच. आपल्याच सारखे आपले श्रीमंत मित्र व सहकारी विद्यार्थी असावेत अशी धारणा त्यांच्यात निर्माण होते का? या सगळ्यात श्रीमंतीचा अहंकार वाढीस लागणे साहजिक आहे. याच अहंकारातू‌न काही जणाच्या मध्ये इतरांना कमी लेखण्याची भावना निर्माण होते. त्यातून मग रेव्हपार्ट्या, नशेबाजी, नशेत अपघात, खून, गुन्हे करून तुरुंगातून सुटून येऊन उत्सव साजरा करणे अशा गोष्टी घडतात.

सगळ्या जातीधर्माची, सगळ्या आर्थिक स्तरातील मुले सोबत शिकायला लागतात तेव्हा काही पालकांना संगती बिघडण्याची, वाईट संस्कार होण्याची निरर्थक भीती वाटायला लागते. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करून चांगले-वाईट कळण्याची ताकद त्यांच्या विचारांत यायला हवी. समाजाचे सारे स्तर, सुख दुःखे यांच्याशी त्यांचा परिचय असला पाहिजे. देशहिताच्या गोष्टी माहिती व्हायला हव्यात. तेव्हा ते चांगला नागरिक घडतील. काही मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती जेमतेम असणारे, काही गरीब असणारे पालक देखील आपला मुलगा/ मुलगी महागड्या शाळेत शिकावा ही इच्छा बाळगतात व त्यातून कर्जबाजारी होतात. अधिक फी असणारी शाळा अधिक चांगली हा मानस पालकांमध्ये अहं निर्माण करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात,
मत्सराचा ठाव शरीरी नसावा।
लाभेविण जीवा दुःख देतो।।
मत्सर व द्वेष यामुळे लाभ नसून जिवाला दुःख होते. समाजात इतरांना दाखविण्यासाठी किंवा मत्सरापोटी ऐपत नसताना आपल्या पाल्याला महाग शाळेत घालणारे पालक अहंकाराचेच बळी आहेत. भरमसाठ फी, आठवड्यातून तीनवेळा वेगळे कपडे, शालेय वस्तूंचा अतिरेक याशिवाय वेगवेगळ्या इवेंट्स साजरे करण्यासाठी खर्च, नियम व अटींची मोठी यादी या सगळ्यांतून शिक्षणाची, उजळणीची जबाबदारी पालकांचीच. इंग्रजी न येणारे पालक इंग्रजी माध्यमाचा कसा अभ्यास घेणार? याउपर मोबाईलवर येणाऱ्या अपडेट साठी सतत रिचार्ज हवा. दहावी-बारावी ॲकॅडमी चे नवे फॅड. नाव एका शाळेत, शिकत आहेत दुसरीकडे त्यासाठी अजून वेगळा खर्च. पालकांना आपण आपल्या पाल्यासाठी खूप करतो आहे असे वाटत राहते. पाल्यांना आपण एका उंच श्रेणीत शिकतो आहे असे वाटते. दोहोंमध्ये येणारा हा अहंकारच आहे.

काही सरकारी शाळांची गुणवत्ता खूप चांगली आहे. परंतु काही ठिकाणी ती नाही शिवाय शिक्षकांची कमतरता भासते तिथे परिपूर्ण व्यवस्था निर्माण झाली तर गरीब विद्यार्थी कसदार शिक्षण घेईलच त्याचबरोबर मध्यम व श्रीमंत वर्ग सुद्धा तिकडे वळेल हे ही लक्षात घेणे तितकेच महत्वाचे. ही दोन्ही प्रकारची मुले एकाच शाळेत शिकली तर, सर्व पातळीवरच्या स्तरातील मुले सोबत राहिली तर दोघांना एकमेकांच्या कमी-अधिकतेची, चांगल्या-वाईटाची, सुख-दुःखाची जाण होऊ शकते. दोहोंच्या पडत्या काळात मदत करण्याची मैत्रभाव टिकून उच्च-नीच भेद कमी होण्यास मदत होईल. आपण सर्व सारखेच आहोत ही भावना रुजली तर समाजात वावरताना समानतेची भावना आपोआप निर्माण होणे सोपे होईल. संत कबीर सांगतात,
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ,
पंडित भया न कोय।
ढाई आखर प्रेम का,
पढ़े सो पंडित होय॥
पुष्कळ पुस्तके वाचूनही खरे शहाणपण मिळेलच असे नाही; प्रेम, माणुसकी आणि संवेदना समजणारा खरा ज्ञानी. शिक्षण म्हणजे केवळ गुण, पदवी आणि सुविधा नव्हेत; जीवनमुल्येही आवश्यक आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘सर्वोच्च शिक्षण तेच, जे केवळ माहिती देत नाही तर आपले जीवन संपूर्ण अस्तित्वाशी सुसंवादी बनवते.’’ आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी साऱ्याच पालकांची धडपड असते, ती योग्य तर आहे. परंतु केवळ पैसा जास्त खर्च केला म्हणजे जास्त चांगले शिक्षण यापेक्षा ज्ञान, व्यवहार कौशल्य वाढवणारे, जीवनमूल्ये देणारे खरे शिक्षण या अर्थाने अवलंब व्हायला पाहिजे. यासाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धती समान पातळीवर असायला हवी. गरिबांना संघर्ष न करता व श्रीमंताना उतू न देणारी शिक्षणाची ज्ञानगंगा रुजवायला हवी. जी अहंकारविरहीत, नम्र-ज्ञानी नागरिक घडवेल.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com