esakal | ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Online-Class

‘माझी मुलगी ओवी चार वर्षांची झाली आहे. तिची पूर्वप्राथमिक शाळा ऑनलाइनद्वारे भरविली जावी, असे वाटते. शाळा बंद असली, तरी पूर्ण शुल्कही भरले आहे. ऑनलाइन वर्ग सुरू व्हावेत. तिला शाळेची ‘व्हर्च्युअल’ का होईना सवय होईल,’ हे भावनिक उद्‌गार आहेत अनिल वानखेडे या पालकाचे.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे - ‘माझी मुलगी ओवी चार वर्षांची झाली आहे. तिची पूर्वप्राथमिक शाळा ऑनलाइनद्वारे भरविली जावी, असे वाटते. शाळा बंद असली, तरी पूर्ण शुल्कही भरले आहे. ऑनलाइन वर्ग सुरू व्हावेत. तिला शाळेची ‘व्हर्च्युअल’ का होईना सवय होईल,’ हे भावनिक उद्‌गार आहेत अनिल वानखेडे या पालकाचे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून, शाळेपासून दूर फेकले जाण्याची भीती वानखेडे यांच्यासारख्या लाखो पालकांना भेडसावत आहे. मोठ्या वर्गातील विद्यार्थी नियमितपणे ऑनलाइन शिक्षण घेत आहेत; मग पूर्वप्राथमिक वर्गात असणारे आपले मूल शाळेपासून दुरावले जाऊ नये, म्हणून त्या काळजीपोटी ‘आमच्या मुलांसाठीही ऑनलाइन वर्ग भरवावा,’ अशी मागणी पालक शाळांकडे करू लागले आहेत. मात्र, लहान मुलांच्या आरोग्याचा सर्वांगीण विकासाचा विचार करता शाळा स्वतःहून पूर्वप्राथमिक वर्गासाठी ऑनलाइन वर्ग भरविण्यास नकार देत आहेत. बाल मानसोपचारतज्ज्ञ देखील ‘लहान मुलांना जास्त स्क्रीन टाइम नसावा’ असे अधोरेखित करत आहेत.

शाळांमार्फत होणारे प्रयत्न 

  • काही ठरावीक दिवशी पालकांची ऑनलाइन बैठक घेऊन मार्गदर्शन
  • मुलांसाठी उपक्रमावर आधारित ‘वर्कशीट’
  • वर्गातील अन्य विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून पालकांसमवेत काही वेळा ऑनलाइन वर्ग
  • पालकांच्या मोबाईलवर गोष्टी, गाणी, फोनिक्‍स याबाबत व्हिडिओ पाठविणे

जुलै २०२० मध्ये सरकारने ऑनलाइन वर्गांसाठी ठरवून दिलेले वेळापत्रक

  • इयत्ता पूर्वप्राथमिक
  • वार सोमवार ते शुक्रवार
  • ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांपर्यंत
  • शिक्षणाचे स्वरूप पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिकविणे योग्य नाही. घरबसल्या या वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून कसे घ्यावे, यासंदर्भात पालकांना समजावून सांगण्यासाठी ऑनलाइन बैठका घ्याव्यात, असे सरकारने सांगितले आहे. 
- माधुरी बर्वे, मुख्याध्यापिका, डीईएस पूर्वप्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा

साधारणतः तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना ऑनलाइन शिक्षण नकोच. अशाप्रकारे शिक्षण देऊन त्याच्यावरील ताण वाढू शकतो. लहान वयात स्क्रीन टाइम शेअरिंग शक्‍यतो टाळायला हवे. पालकांनी शिक्षकांच्या मदतीने मुलांसाठी शालेय उपक्रम घ्यावेत.
- डॉ. ज्योती शेट्टी, मनोविकारतज्ज्ञ

Edited By - Prashant Patil