

परितेची पाणीपुरवठ्याची विहीरच ‘चोरीला’!
कोकाटेंच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी; पाणीप्रश्न गंभीर
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : परिते (ता. माढा) ग्रामपंचायतीची गावास पाणीपुरवठा करणारी विहीरच चोरीस गेल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य सविता कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. विहीर शोधून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आश्वासन दिले.
परिते ग्रामपंचायतीची ही विहीर खासगी व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर असल्याची माहिती समोर आली आहे. २०११ आणि २०१८ मध्ये शासकीय निधीतून विहिरीची खोदाई व गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, विहिरीच्या जागेची नोंद उताऱ्यावर शासनाच्या मालकीची करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित खासगी व्यक्तीने विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यास विरोध केल्याचे सांगण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने सध्या या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले.
---
कोट
जुन्या विहिरीतून परिते गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. ज्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी खर्च करण्यात आला, त्या विहिरीच्या जागेची नोंद अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उताऱ्यावर करण्यात आली नाही. त्यामुळे विहीरच चोरीस गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी विहीर शोधून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- सविता कोकाटे, जि.प. सदस्या, बेंबळे
---
कोट
सदस्या कोकाटे यांनी सभागृहात विहीर चोरीस गेल्याची तक्रार केली आहे. याबाबत माझ्याकडे माहिती नाही. तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे. नेमकी विहीर चोरीस गेली आहे की आणखी काय अडचण आहे, याबाबत माहिती घेतली जाणार आहे.
- प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.