esakal | मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - पार्थ पवार
sakal

बोलून बातमी शोधा

parth pawar

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच पार्थ पवार यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या फोटोसह त्याने लिहिलेली सुसाइड नोट शेअर केली आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - पार्थ पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी विनंतीसुद्धा पार्थ पवार यांनी केली आहे. 

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने शिक्षणाच्या चिंतेमुळे विवेक नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी ट्विट केलं आहे. 

हे वाचा - पुणेकरांची घटत्‍या चाचण्यांच्या आड लपली रुग्णसंख्या

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच पार्थ पवार यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या फोटोसह त्याने लिहिलेली सुसाइड नोट शेअर केली आहे. पार्थ पवार म्हणाले की, विवेकसारखे तरुण आत्महत्या करत आहेत. आता मराठा नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं. 

मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलायला हवीत. आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढण्याआधी मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि आरक्षणासाठी लढावं. राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असंही पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विवेकच्या आत्महत्येनं आता तरी यंत्रणा जागी होईल. पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात जात आहे. आपल्या हातात काही नसलं तरी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज जाऊ शकतो असं पार्थ पवार म्हणाले. विवेकला न्याय मिळावा यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी तयार आहे. याशिवाय इतरही अनेक हतबल विवेक आहेत त्यांना न्याय मिळवून देऊ.