बारामतीत पासपोर्ट कार्यालय

Passport
Passport

बारामती शहर - पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी विदेश मंत्रालयाने बारामती येथे पासपोर्ट कार्यालय मंजूर केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर बारामतीकरांची ही मागणी मंजूर झाली आहे.

विदेश विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या संदर्भात मोलाची मदत केली असून, सुप्रिया सुळे यांच्यामार्फत गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. आता विदेश मंत्रालयाने देशभरात २८९ ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रात बारामतीसह पाच ठिकाणी ही कार्यालय सुरू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बारामती पंचक्रोशीतून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. दर वेळेस ज्येष्ठ नागरिकांसह छोट्या मुलांनाही पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. आता बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरू होत असल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा वाचणार असून, पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होईल, असा अंदाज आहे.

बारामती कार्यालयाला कोणते तालुके जोडले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी या परिसरातील पन्नास किलोमीटर क्षेत्रातील नागरिकांना या पुढील काळात पासपोर्टसाठी पुण्याला जाण्याची आवश्‍यकता पडणार नाही. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर यांसारख्या तालुक्‍यांना बारामती कार्यालयाशी जोडले जाईल, असा अंदाज आहे. या कार्यालयाचा प्रारंभ नेमका केव्हा होणार, हेही अद्याप स्पष्ट नसले तरी परराष्ट्र मंत्रालयाने लवकरात लवकर हे कार्यालय बारामतीत सुरू करावे, यासाठी खासदार सुळे व अजित पवार प्रयत्नशील आहेत.

पोस्टाशी संलग्न अशी आठ पासपोर्ट कार्यालये सुरू केली जाणार आहेत. लातूर, पंढरपूर, माढा व बारामतीचा त्यात समावेश आहे. यामुळे या भागातील लोकांना त्यांच्या गावातच पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
- अनंत ताकवले, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे 

बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालयाला आवश्‍यक जागा देण्याची तयारी केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही पासपोर्ट कार्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. 
- हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com