‘सीओईपी’ला ट्रायबोमीटरचे पेटंट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

अमेरिका आणि जर्मनीच्या प्रतिस्पर्धी पेटंटवर मात करत, ‘सीओईपी’कडे बौद्धिक संपदा हक्क राखण्यात संशोधकांना यश आले आहे.

पुणे - औद्योगिक कारखान्यांमध्ये विविध धातूच्या उत्पादनांची आणि संयंत्रांचे होणारे घर्षण आणि झीज याचे निरीक्षण घेणे निर्मात्यांसमोरील महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी आजपर्यंत एकाच वजनाला घर्षण आणि झीज यांचे परीक्षण करणारे ट्रायबोमीटर वापरण्यात येत होते. पण पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) सहायक प्राध्यापक डॉ. सुधीर पाटील, आनंदकुमार पाटील या संशोधकांनी बदलत्या भारस्थितीत निरीक्षण घेणारे ट्रायबोमीटर विकसित केले आहे आणि त्याचे पेटंटही मिळविले आहे.

अमेरिका आणि जर्मनीच्या प्रतिस्पर्धी पेटंटवर मात करत, ‘सीओईपी’कडे बौद्धिक संपदा हक्क राखण्यात संशोधकांना यश आले आहे. डॉ. सुधीर पाटील म्हणाले, ‘‘विविध प्रकारच्या सापेक्ष गतींसाठी विविध पदार्थांच्या घर्षण आणि झीज यांच्याशी संबंधित वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात येतो. बाजारात उपलब्ध ट्रायबोमीटर स्थिर भार असताना चाचणी घेण्यासाठी सक्षम असतात. परंतु, वास्तविक परिस्थितीत पदार्थांच्या ट्रायबॉलॉजिकल वर्तनाची चाचणी घेण्यासाठी बदलत्या भारस्थितीत कार्य करणाऱ्या  ट्रायबोमीटरच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न केले.’’ 

डॉ. सुधीर पाटील यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग असलेले संयंत्राच्या चाचण्या आनंदकुमार पाटील यांनी घेतल्या. उत्पादन अभियांत्रिकी आणि औद्योगिक व्यवस्थापन विभागातील प्रा. एस. के. बसू आणि संचालक प्रा. बी. बी आहुजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (एनआरडीसी) आर्थिक साह्य या प्रकल्पासाठी प्राप्त झाले. 

या पेटंट ‘सीओइपी’च्या बौद्धिक संपदा हक्कांच्या यादीत महत्त्वपूर्ण भर आहे. राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख या संशोधनामुळे संस्थेला मिळाली आहे. औद्योगिक जगतासाठी हे पेटंट निश्‍चित महत्त्वपूर्ण आहे.
- प्रा. बी. बी. आहुजा, संचालक, सीओईपी 

ट्रायबोमीटरचे वैशिष्ट्ये
  बदलत्या भारस्थितीत निरीक्षणे देणारे ट्रायबोमीटर
 स्थिर भार, पुनरावृत्ती भार, चढ, उतार आणि अतिरिक्त बदलत्या भारामध्ये यशस्वी चाचणी
 अखंडपणे, चक्राकार पद्धतीने निरीक्षणे घेणे शक्‍य होणार
  वेळ, संसाधने आणि परिश्रम यांची बचत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patent of the Tribometer to COEP

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: