#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल महावितरणच्या ऊर्जा विभागाने देऊन पुन्हा एकदा हात वर केले आहेत. त्यामुळे ही आग कशामुळे लागली, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. तर ऊर्जा विभागाच्या या अहवालामुळे आगीत बाधित झालेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल महावितरणच्या ऊर्जा विभागाने देऊन पुन्हा एकदा हात वर केले आहेत. त्यामुळे ही आग कशामुळे लागली, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. तर ऊर्जा विभागाच्या या अहवालामुळे आगीत बाधित झालेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट मध्ये २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत सुमारे ९०हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा तेथे होती.

तसे अग्निशामक विभागाकडून आणि पोलिसांकडून देखील हेच कारण पुढे करण्यात आले होते. दरम्यान या आगीच्या कारणांची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांनी ऊर्जा विभागाला पत्र दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी खराडी येथील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आगीच्या ठिकाणी भेट देऊन आपला अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे.

त्यामध्ये ‘आगीच्या ठिकाणी पाहणी केली असता, सर्व विद्युत संच मांडणी आगीमध्ये नष्ट झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी लागलेली आग ही नेमकी कोणत्या कारणाने लागली, याबाबतचा कोणतीही परिस्थितीजन्य पुरावा आढळून न आल्यामुळे आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही,’ असा अहवाल दिला आहे. त्यामुळे पाटील इस्टेटमधील आग नक्की कशामुळे लागली आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

परिणामी आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देताना या अहवालामुळे अडचणी येऊ शकतात, असे महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या बोलीवर सांगितले.

धक्कादायक अहवाल
वास्तविक या झोपडपट्टीमध्ये एकाच मीटरवरून अनेक घरांना वीज देण्यात आली आहे. त्यांचा वापरही मोठा आहे. आगीच्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केल्यानंतर हे स्पष्ट होत असताना, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा अहवाल कसा दिला, अशी शंका उपस्थित केली जात आहे. खराडी येथील ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरणातदेखील अशा प्रकारे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केल्यामुळे त्यामध्ये मरण पावलेल्या दोन संगणक अभियंत्यांना अद्याप आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.

आगीच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही. तसेच संबंधित घराचा वीज पुरवठा २००९पासून खंडित होता. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा न मिळाल्यामुळेच आगीमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, त्यामुळे असा अहवाल दिला आहे.
- चं. तु. थोरात, विद्युत निरीक्षक, ऊर्जा विभाग.

Web Title: Patil Estate Slum Fire Reason Unsure