परिवर्तनाच्या ‘तेजस्वी‘ पॅटर्नचा डंका

हातभट्टीवाल्यांच्या पुनर्वसनातून आदर्श सामाजिक संदेश
Tejaswi Satpute Social Work
Tejaswi Satpute Social Worke sakal

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसिंग करता-करता सामाजिक कामाचा उचललेला विडा सत्कारणी लागलेला दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांवर विशेषत: हातभट्टी व्यावसायिकांवर कारवाईच्या बडग्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनावर भर देत ‘ऑपरेशन परिवर्तन' योजना राबविली. ही अभिनव योजना मूर्त रूप धारण करत असतानाच हा पॅटर्न राज्यभर राबविला जावा, अशी अपेक्षा आहे. गेल्या दीड वर्षात हा पॅटर्न यशस्वीतेच्या वाटेवर चालला असून हातभट्टी दारू तयार करणारे तथा त्यावर अवलंबून असलेल्या ६०४ पैकी ४४७ जणांनी तो व्यवसाय सोडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तेजस्वी सातपुते यांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन पॅटर्न'चे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत तोंडभरून कोतुक केले. त्यामुळे या पॅटर्नचा डंका राज्यभर वाजत आहे.

काय आहे ऑपरेशन परिवर्तन?

सोलापूर जिल्ह्यातील ६० गावांमध्ये हातभट्टी तयार होऊन ती सोलापूरसह १२४ गावांमध्ये विकली जात होती. हातभट्टी अड्ड्यांवर आठवड्यातून तीनवेळा छापे टाकून तेथील अशा धंदेवाल्यांचे समुपदेशन करणे, त्यातून बाहेर पडणाऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि यातून त्यांच्या पुनर्वसनाची ही योजना आहे. हातभट्टी धंद्यातून बाहेर पडलेल्यांसाठी कुशल रोजगार उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हानच होते. त्यांना कुशल करण्याबरोबरच त्यांच्या हातांना काम देणे आणि त्या कामाचा परतावा मिळणे गरजेचा होता. काम देणारे आणि खरेदीदार, तसेच संबंधित सर्व यंत्रणा यांची साखळी तयार करण्याचे मोठे आव्हान पोलिस अधीक्षक सातपुते यांनी पेलले आहे; जेणेकरून पूर्वीचा अवैध धंदा मोडीत निघेल आणि पुन्हा ती वाट धरणार नाहीत, याचेही भान ठेवण्यात आले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी गाळण्याचे प्रमाण तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाले आहे.

वित्तीय संस्थांची मदत

अवैध धंदेवाल्यांना शक्यतो वैयक्तिक अथवा संस्थात्मक पातळीवर कोणीही कोणत्याही प्रकारची मदत देत नाही. अशा कठीण परिस्थितीत जिल्हा उद्योग केंद्राबरोबरच विविध वित्तीय संस्थांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून अवैध धंद्यांतून बाहेर पडण्यासाठी व मोठी मदत मिळवून देण्यासाठी सातपुते यांनी पुढाकार घेतला. विविध बँका, फायनान्स कंपन्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मिटकॉनने प्रशिक्षणाचा वाटा उचलला.

केसेस झाल्या कमी

समुपदेशन, प्रशिक्षणानंतर पुनर्वसनाचे काम चोखपणे झाल्याने तसेच अवैध धंदेवाल्यांची मानसिकताच बदलल्याने केसेसच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२१ मध्ये या कालावधीत सर्वाधिक अशा २६२ केसेसद्वारे ३०१ जणांवर कारवाई झाली होती. ऑपरेशन परिवर्तन पॅटर्न सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस हे प्रमाण घटतच गेले. १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२२ या दिवसांत फक्त १२ केसेस अन् १४ जणांवर कारवाई झाली. १ सप्टेंबर २०२१ ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत ५७३ केसेस दाखल करून ६६० जणांविरुद्ध कारवाई झाली. पोलिसांच्या कारवाईनुसार आतापर्यंत एक कोटी अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकीकडे केसेस कमी होणे अन् दुसरीकडे या व्यवसायापासून परावृत्त झालेल्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याची कसोटी यातून या ऑपरेशन परिवर्तनची यशस्वीता अवलंबून होती. ती पोलिस अधीक्षक सातपुते यानी साध्य केली आहे.

‘सकाळ'च्या तनिष्कांची यशोगाथा अन् हातभार

‘सकाळ'च्या करजगी (ता. अक्कलकोट) येथील तनिष्का गटाच्या वतीने सदस्यांना गारमेंट उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिला स्वावलंबी झाल्या. यासाठी जय फाउंडेशनचे आसिफ यत्नाळ यांचे प्रयत्न उपयोगी पडले. पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तनसाठी हे इन्पूट दिल्यास योग्य राहील, असे त्यांना वाटल्याने त्यांनी तनिष्का गटाची यशोगाथा सांगून हातभट्टी धंद्यातील पुरुषांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी हा पॅटर्न लागू करण्याची योजना सांगितली. त्यातून मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील महिलांना रोजगार उपलब्ध झाला.

आता ऑनलाइन काम

परिवर्तनमधील सदस्यांना यापुढे पर्स, पिशवीवरील नक्षीकामातून कमी खर्चातून जादा उत्पन्न मिळवून देण्याची योजना अंमलात येत आहे. या संदर्भात ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यातून महिलांना ऑनलाइन पद्धतीने काम मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचीही तयारी सुरू आहे. या संदर्भात नुकतेच एक पथक येऊन पाहणी करुन गेले. ऑनलाईन व्यावसायासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दारू गाळणाऱ्यांच्या मुलांचे घडविले भवितव्य

हातभट्टी गाळणाऱ्यांसह तेथे काम करणाऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळाली आणि त्यांच्या भवितव्याची चिंता दूर झाल्यास ते लोक पुन्हा हा धंदा करणार नाहीत, याचीही जाण पोलिस अधीक्षकांना होती. त्यांच्यासोबत त्यांनी पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांसाठी जॉब फेअर घेतला. जवळपास ९०० तरुणांना त्यातून विविध खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. आता मे महिन्यात पुन्हा एकदा नोकरी मेळावा घेण्याचे नियोजन आह

पुनर्वसनाचा नवा पॅटर्न

ग्रामीण भागातून सोलापुरज्ञत मोठ्या प्रमाणात हातभट्टी येत होती. हा उद्योग बंद करताना त्यांचे योग्य पुनर्वसन होण्याची गरज ओळखून पोलिस अधीक्षक सातपुते यांनी त्यांच्या हाताला काम देण्याची योजना आखली. सोलापुरात गारमेंटचा मोठा उद्योग असून अशा उद्योजकांना सोबत घेत तो अवैध व्यवसाय करणाऱ्यांना काम देण्यात आले. सुरवातीला ‘मिटकॉन’मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. ते लोक कुशल झाल्यानंतर त्यांना रोजगाराची उपलब्धी करून दिली. सध्या मुळेगाव तांड्यावरील ६०४ पैकी ४४५ जणांच्या हातांना काम मिळाले आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा हा एक वेगळाच पॅटर्न तयार झाला आहे. त्यामध्ये गारमेंटबरोबरच (४५), शेती (८७), मजुरी (६५), पशुपालन (५१), खासगी कंपनीत नोकरी (९८), दुकाने (६५) व इतर (५३) अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते लोक सध्या काम करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com