Hemangi Majhire : सीएस होऊन हेमांगीने केले दिवंगत पित्याचे स्वप्न पूर्ण

जिद्द, संयम आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर भुकूम (ता. मुळशी) येथील हेमांगी मदन माझिरे हिने कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम चिकाटीने केला पूर्ण.
Hemangi Majhire
Hemangi Majhiresakal
Updated on

पौड - जिद्द, संयम आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर भुकूम (ता. मुळशी) येथील हेमांगी मदन माझिरे हिने कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम चिकाटीने पूर्ण केला. वडीलांच्या आकस्मित अपघाती मृत्यूने कौटुंबिक आणि मानसिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या हेमांगीने दुःख बाजूला सारत वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. बाबांची स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करणाऱ्या या लेकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आई, एक भाऊ, एक बहीण असा हेमांगीचा परिवार आहे. तिचे वडील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात कामाला होते. पहिली ते दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण एमआयटी शाळेत झाले. सलग दहा वर्षे तिला शाळेत स्टुडंट ऑफ द्‍ इयरचा पुरस्कार मिळाला. दहावीत तिला ९२ टक्के गुण मिळाले.

तिला गणिताची पहिल्यापासून आवड होती. तथापि चांगले मार्क मिळाल्याने नातेवाईक, मैत्रिणींनी तिला विज्ञान शाखेत जाण्याचा सल्ला दिला. परंतु समाजातील अनुभवाच्या जोरावर वाणिज्य शाखेतून कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करण्याचा त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला.

त्यामुळे बीएमसीसीमध्ये तिने वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. कावेरी महाविद्यालयात बी. कॉमसाठी प्रवेश घेतला. तसेच सीएसच्या प्रवेश परीक्षेचीही तयारी सुरू केली. प्रवेश परीक्षा ऑनलाइन होती. त्यात उत्तीर्ण होऊन पुढील अभ्यासाला सुरूवात केली. परंतु पहिल्या परीक्षेमध्ये तिला यश मिळाले नाही.

दरम्यान एप्रिल २०२२ मध्ये तिच्या वडीलांचे अपघाती निधन झाले. पित्याचे छत्र हरविल्याने हेमांगीच्या कुटुंबावर संकट ओढवले. तिचीही मनःस्थिती अस्थिर झाली. तिला आईने धीर देवून तिच्यातील आत्मविश्वास वाढविला. हेमांगीने स्वतःवर संयम ठेवत वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुःख बाजूला सारले.

या दरम्यान तिच्या वाचनात रहस्य नावाचे पुस्तक आले. त्यातून प्रेरणा घेत तिने स्वतःचे ध्येय निश्‍चित केले. सीएससाठी खासगी शिकवणी लावली. घरात आईला थोडीफार मदत करीत दररोज सलग आठ तास अभ्यास केला. घोकंपट्टीपेक्षा मुद्दा समजून घेऊन तो सोडविण्यावर तिचा भर होता. सोशल मिडीयाचाही त्यासाठी वापर केला.

याच कालावधीत योगा शिक्षिकेचाही कोर्स तिने पूर्ण केला. दुःखातून बाजूला काढण्यासाठी योगा महत्त्वाचा ठरला. सीएसच्या अभ्यासक्रम तिने यशस्वीपणे पूर्ण करीत वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल भुकूमवासियांनी तिचे कौतुक केले.

माझे वडील माझ्यासाठी मोठी प्रेरणा होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कौटुंबिक दुःख, संकट बाजूला ठेवले. माझे ध्येय पक्के केले. अभ्यासात नियमितपणा आणि सातत्य ठेवले. दररोज योग करून मनःस्वास्थ्य बळकट केले. त्यामुळे हे यश मिळाले. आगामी काळात एलएलबी करून नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सर्वांत जास्त समाधान आहे.

- हेमांगी माझिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com