प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार : राज्यमंत्री भेगडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 August 2019

"पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार," असे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.

पवनानगर (पुणे) : "पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार," असे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले. बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांसाठी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
9 ऑगस्ट 2011 रोजी द्रुतगती मार्गावर बऊर येथे झालेल्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेस  खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिगंबर भेगडे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रवींद्र भेगडे, सुनील शेळके, माजी सभापती एकनाथ टिळे, कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी आदी उपस्थित होते. 

भेगडे म्हणाले, "या आंदोलनात 179 शेतकऱ्यांवर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते. ते सर्व मागे घेतले असून, आंदोलनात जखमी झाल्याने अपंगत्व आलेल्या तरुणांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न करणार आहे. 

दळवी म्हणाले, "बंदिस्त जलवाहिनीचा लढा हा राजकीय नसून, 2050 वर्षाचा विचार करता मावळ तालुक्‍याला पाण्याची गरज भासणार आहे. परंतु, तत्कालीन 
सरकारची ऐकण्याची मनःस्थिती नव्हती. त्यामुळेच ही घटना घडली. हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे."
 
बारणे म्हणाले, "राजकीय जोडे बाजूला ठेवून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे."
 
सकाळी 10 वाजता आंदोलन झालेल्या ठिकाणावरून ज्योत आणण्यात आली. त्यानंतर येळसे येथील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फेरी काढून ज्योत कार्यालयात आणून दुपारी 12.40 वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एकनाथ टिळे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavana pipe line project's fight will continue till is cancelled said state minister bala bhegade