पवनाथडी जत्रेचा रंग ‘फिका’; आनंदाचाही तुटवडा

पवनाथडी जत्रेचा रंग ‘फिका’; आनंदाचाही तुटवडा

Published on

पिंपळे गुरव, ता. २६ ः कडक ऊन आणि दहावीच्या परीक्षा यामुळे पवनाथडी जत्रेला दुसऱ्या दिवशी गुरुवारी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभल्याचा दिसून आला नाही. याशिवाय, जत्रेच्या नियोजनातही बऱ्याच त्रुटी राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, स्टॉल्सधारकांमध्ये नाराजीची भावना आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित पवनाथडी जत्रेचे बुधवारी उद्‍घाटन झाले. मात्र, जत्रेच्या नियोजनाबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. मैदानावर कुठे कोणता विभाग, स्टॉल किंवा उपक्रम आहे ? याबाबत स्पष्ट दिशादर्शक फलक नाहीत. मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला जत्रेचा नकाशा अत्यंत लहान आणि अस्पष्ट असल्यामुळे तो वाचणे कठीण जात असल्याची तक्रार अनेकांनी केली. परिणामी, नागरिकांना अपेक्षित स्टॉल शोधण्यासाठी मैदानभर फिरावे लागत आहे.
यंदा जत्रेतील स्टॉलच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याची व्यवस्था मुख्य मार्गाच्या एका टोकाला ठेवण्यात आली असून खाद्यपदार्थांचे स्टॉल दुसऱ्या बाजूस आहेत. त्यामुळे नाॅनव्हेज, भेळ, पाणीपुरी, भजी, इतर पदार्थ खरेदी करणाऱ्या नागरिकांना हात धुण्यासाठी लांब जावे लागत आहे. अनेक ठिकाणी हात धुण्यासाठी कोणतीही तात्पुरती नळव्यवस्था किंवा पाण्याचे पिंप उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा जत्रेचा मुख्य उद्देश आहे. मात्र स्टॉलवर येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छतेच्या सोयींकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. स्वच्छ पाणी, हात धुण्याची सुविधा आणि कचरा व्यवस्थापन यांची योग्य आखणी केल्यास जत्रेचा अनुभव अधिक सुखद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काय आहेत त्रुटी ?
- जमिनीवरील मॅट व्यवस्थित चिकटवले नाहीत, पाय अडकून पडण्याच्या घटना
- व्हेज, नॉनव्हेज स्टॉल्सवर पुरेशी सावली किंवा छताचा अभाव
- वाहन तळाचे फलक नाहीत, वाहने लावण्याबाबत नागरिकांत संभ्रम
- मुख्य प्रवेशद्वारावर अनधिकृत फ्लेक्स लावण्याची चढाओढ


अधिकाऱ्यांच्या नावाचे फलक
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या क्षयरोग शोध मोहीम व जनजागृती अभियानाच्या स्टॉलमध्ये चक्क वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे आणि माजी आयुक्त शेखर सिंग यांच्या नावांचे फ्लेक्स लावलेले दिसून आले.


व्हेज - नॉनव्हेज स्टॉलमध्ये आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन तसेच अग्निशमन दलाचे वाहन वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याने इथे छत टाकले जात नाही.
- सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

पवनाथडी जत्रेला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र दहावीच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा सुरू असताना जत्रेचे आयोजन करण्यामागचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा विचार न करता कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली का ? की चालू आर्थिक वर्षातील बजेटची तरतूद संपविण्याच्या घाईत हा निर्णय घेण्यात आला ?
- अमित पसरणीकर, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com