

तळेगाव दाभाडे, ता. १४ : पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १९ नोव्हेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी प्राधान्याने मांडण्यात येणार आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन, प्रलंबित मोबदला आणि अन्य प्रश्नांवरही चर्चा होणार आहे. जलवाहिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून केंद्रस्थानी आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला मावळमधील शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. या प्रश्नावर नऊ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाबाबत मावळवासीयांच्या भावना तीव्र आहेत. दरम्यान, पवना धरणग्रस्तांचे अपूर्ण पुनर्वसन, प्रलंबित मोबदला, वारस नोंदी, जमीन वाटप तसेच पुनर्वसित गावांमधील पायाभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप सर्व प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही.
धरणग्रस्त संयुक्त समितीचे अध्यक्ष नारायण बोडके म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत १९ नोव्हेंबरला बैठक होणार असल्याचे रवींद्र भेगडे यांनी आम्हाला सांगितले आहे. मात्र, अद्याप बैठकीचे अधिकृत पत्र मिळालेले नाही. १९ नोव्हेंबरला बैठक न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन, असे आश्वासन भेगडे यांनी दिले आहे. या बैठकीत पुनर्वसनासह पवना बंदिस्त जलवाहिनी कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यांना कोणी चुकीची माहिती देऊ नये. आमची फसवणूक झाल्यास आंदोलन थांबविणार नाही. धरणग्रस्त शेतकरी माफ करणार नाहीत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.