पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

तुमचे वाहन १५ वर्षांपेक्षा जुने आहे अन्‌ ते पुन्हा चालवायचे आहे, तर पर्यावरण कर भरा अन्‌ बिनदिक्कत ते चालवा, हा ट्रेंड आता रूढ होत आहे. गेल्या नऊ महिन्यांत सुमारे ५ कोटी २७ लाखांचा पर्यावरण कर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. सुमारे दीड ते दोन हजारांहून अधिक पुणेकरांनी त्याचा भरणा केला आहे.

पुणे - तुमचे वाहन १५ वर्षांपेक्षा जुने आहे अन्‌ ते पुन्हा चालवायचे आहे, तर पर्यावरण कर भरा अन्‌ बिनदिक्कत ते चालवा, हा ट्रेंड आता रूढ होत आहे. गेल्या नऊ महिन्यांत सुमारे ५ कोटी २७ लाखांचा पर्यावरण कर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. सुमारे दीड ते दोन हजारांहून अधिक पुणेकरांनी त्याचा भरणा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या निर्मितीस १५ वर्षे पूर्ण झाल्यावर ते चालवायचे असेल, तर पर्यावरण कर भरणे सक्तीचे आहे. जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत नाही ना, याची खात्री करून घेतली जाते. तसेच, सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण करीत असेल, तरच कर भरून घेतला जातो. जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने परिवहन कार्यालयामार्फत २०१० पासून पर्यावरण कर आकारणीस प्रारंभ केला आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ‘‘पंधरा वर्षांवरील व्यावसायिक वापराच्या वाहनाचा परवाना नूतनीकरण करताना त्याची सद्यःस्थिती लक्षात घेतली जाते. त्या वाहनामुळे प्रदूषणात भर पडणार असेल, तर ते चालविण्यासाठी परवानगी दिली जात नाही. सुस्थितीत असेल, तरच कर भरून घेतला जातो.’’ वैयक्तिक जुन्या वाहनांवरील प्रेमापोटी पर्यावरण कर भरून ते वाहन स्वतःकडे ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay environmental taxes and drive old vehicles