पुण्यासाठी पुढच्यावर्षीचा; पिंपरीसाठी डिसेंबरचा मुहूर्त 

मंगेश कोळपकर - सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 25 August 2020

मेट्रो प्रकल्पाचे काम दोन्ही शहरांत वेगाने सुरू होते. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये 25 मार्चपासून सुमारे 35 दिवस हे काम बंद होते. त्यानंतर काही प्रमाणात काम सुरू करण्याची परवानगी मिळाली.

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीचे चित्र बदलू शकेल, अशा प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या वाहतुकीला काही महिन्यांत प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो डिसेंबरअखेरीस धावेल तर, पुण्यात पुढील वर्षी मार्चमध्ये धावेल, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले. 

मेट्रो प्रकल्पाचे काम दोन्ही शहरांत वेगाने सुरू होते. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये 25 मार्चपासून सुमारे 35 दिवस हे काम बंद होते. त्यानंतर काही प्रमाणात काम सुरू करण्याची परवानगी मिळाली. परंतु, 8 मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाल्यावर अनेक कामगार मोठ्या संख्येने झारखंड, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत परतले. त्यामुळे मेट्रोच्या कामांना धक्का बसला. अजूनही मेट्रोचे काम सुरळीत झालेले नाही. दोन्ही शहरांत सध्या 2600 मजूर असून आणखी 40 टक्के मजूर परततील, या प्रतीक्षेत महामेट्रो प्रशासन आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन्ही शहरांत अनुक्रमे पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यानच्या प्राधान्यक्रमातील टप्प्यात मेट्रो डिसेंबर 2019 पासून धावेल, अशी घोषणा यापूर्वी केली होती. त्यानंतर जूनचा मुहूर्त दिला होता. परंतु, कोरोनामुळे हा टप्पा लांबणीवर पडला आहे. आता पुण्यातील मेट्रो पुढीलवर्षी मार्चमध्ये तर पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो येत्या डिसेंबरपर्यंत धावेल, असा मेट्रो प्रशासनाचा दावा आहे. दोन्ही प्राधान्यक्रमांतील मेट्रो मार्गावर प्रत्येकी तीन स्थानके असतील. त्या स्थानकांची लांबी 140 मीटर, रुंदी 21 मीटर आणि जमिनीपासून उंची 20 ते 22 मीटरवर स्थानक असेल. पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यानच्या चार स्थानकांच्या कामावर पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रित केले आहे, असे महामेट्रोने सांगितले. त्यावर मेट्रो सुरू झाल्यावर अन्य स्थानकांची कामे पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड ः 
- संत तुकाराम नगर ते फुगेवाडी (अंतर सुमारे 5.8 किलोमीटर) 
- तीन स्थानके उभारणीचे काम 60 टक्के पूर्ण 
- लोहमार्ग टाकण्याचे काम सुमारे साडेदहा किलोमीटर पूर्ण 
- सिग्नलिंग, इलेक्‍ट्रिकच्या कामांना वेग 
- पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंत आठ स्थानके उभारण्यासाठी 497 कोटींची निविदा मंजूर 
- 1 नोव्हेंबर 2017 रोजी कामाला सुरूवात 
- डिसेंबर 2020 पर्यंत काम पूर्ण होणार 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे 
- वनाज-गरवारे महाविद्यालय (अंतर सुमारे 5 किलोमीटर) 
- तीन स्थानके उभारणीचे काम सुमारे 60 टक्के पूर्ण 
- लोहमार्ग टाकण्याचे काम सुमारे साडेतीन किलोमीटर पूर्ण 
- सिग्नलिंग, इलेक्‍ट्रिकच्या कामांना काही प्रमाणात वेग 
- वनाज ते सिव्हिल कोर्ट दरम्यान सात स्थानके उभारण्यासाठी 483 कोटींची निविदा मंजूर 
- 4 जानेवारी 2018 रोजी कामाला सुरूवात 
- मार्च 2020 पर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC Metro will run by the end of Dec while in Pune it will run in March next year