हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पीरसाहेब दर्गा
PTK26B01041 : पीरसाहेब दर्गा
मोहन कोळी, पटवर्धन कुरोली
हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पीरसाहेब दर्गा
भीमा नदीच्या काठावर पंढरपूर तालुक्यातील पिराजी कुरोली गावात पीरसाहेबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. भारतीय संस्कृती जपणारे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून या दर्ग्याने आपली ओळख निर्माण केली आहे. येथे रंगपंचमीला पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. याही वर्षी शनिवारपासून यात्रा सुरू झाली आहे. रविवार (ता. ८) हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
या ठिकाणी हजरत बडेसाहेब, महासाहेब, सावली मलिक, हजरत सय्यद बाबा आणि हजरत गायकवाड साहेब असे पाच पीर आहेत. या ठिकाणाला भारतातील मुस्लिमांच्या पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. तसेच मुस्लिमांसह इतर धर्मांतील लोकही या दर्ग्यात दर्शनासाठी दररोज येतात. त्यामुळे हा दर्गा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानला जातो.
पंढरपूर तालुक्यातील पिराजी कुरोली हे गाव संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुकामाचे ठिकाण आहे. त्यामुळे या गावाची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. अशी धार्मिक परंपरा लाभलेल्या या गावात पीरसाहेबांचा दर्गा आहे. याचमुळे या गावाला पिराजी कुरोली असे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.
भीमा नदीच्या काठावर असलेला पीरसाहेबांचा दर्गा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या दर्ग्याच्या बांधकामात भारतीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसून येतो. दर्ग्याचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला पीरसाहेबांचा दर्गा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. अकबर बादशहाच्या काळात बांधलेला हा दर्गा असून दरवर्षी रंगपंचमीला येथे यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सोहळा तीन दिवस चालतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून हजारो हिंदू-मुस्लिम भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
रंगपंचमीच्या आदल्या दिवशी संदलचा कार्यक्रम होतो. नवीन गिलाफ, फुले, मलिदा, नारळ आणि उदबत्ती घेऊन सर्व हिंदू-मुस्लिम भाविक संदलमध्ये सहभागी होतात. या संदलसाठी नागपूरहून दर्ग्याची चादर आणली जाते. हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती-धर्मांचे भाविक वाजत-गाजत ही चादर दर्ग्यात नेतात. रात्री बारा वाजता पीरसाहेबांवर रंगाची उधळण केली जाते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे पीरसाहेबांवर रंग टाकल्याशिवाय गावात रंग खेळला जात नाही.
रंगपंचमीच्या दिवशी मिलाद व शेरणीचे कार्यक्रम होतात. तिसऱ्या दिवशी भेदी गाण्याचा कार्यक्रम तसेच निकाली कुस्त्यांचे मैदान भरविले जाते. यासोबतच विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. नवसाला पावणारा दर्गा म्हणून परिसरात त्याचा मोठा नावलौकिक आहे. पीरसाहेबांचा दर्गा हे येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत मानले जाते. गावात ९५ टक्के हिंदू असूनही सर्व जाती-धर्मांतील ग्रामस्थ या दर्ग्याची नित्यनेमाने पूजा-अर्चा करतात. गावातील लोक बहुतांश धार्मिक वृत्तीचे आहेत. या दर्ग्याची जबाबदारी मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर असते.
गावातून दर्ग्यात जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पीरसाहेबांच्या दर्ग्याजवळूनच जुना पंढरपूर ते अकलूज पालखीमार्ग जातो. यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थांची दहा दिवस आधी बैठक घेतली जाते. या बैठकीत कार्यक्रमांची आखणी केली जाते आणि ही परंपरा दरवर्षी पाळली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

