Video : ...अन् बारामती थबकली!

मिलिंद संगई
Sunday, 22 March 2020

कटसमयी बारामतीकर एक असतात, ही एकजूट अत्यंत मजबूतपणे दिसते याचा प्रत्यय आजही आला.

बारामती : संकटसमयी बारामतीकर एक असतात, ही एकजूट अत्यंत मजबूतपणे दिसते याचा प्रत्यय आजही आला. खंबीर व मजबूत बारामतीकरांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीच्या इतिहासात प्रथमच सर्व बारामतीकर आपापल्या घरात असलेले आढळले. निर्मनुष्य रस्ते व कमालीची शांतता असे क्षण बारामतीने प्रथमच अनुभवले. बारामती थबकल्याचे अनेक वर्षानंतर आज पाहायला मिळाले. सकाळी सातपासून जनता कर्फ्यूच्या आवाहनास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोणीही आज घराबाहेरच पडले नाही, त्यामुळे रस्ते ओस पडलेले होते. कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, ही बाब बारामतीकरांनी खऱ्या अर्थाने आज मनावर घेतल्याचे दिसून आले. 

कोणतेही संकट आले तर त्या संकटाला एकजूटीने सामोरे जाण्याची बारामतीची परंपरा आहे. आज कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठीही बारामतीकरांनी उत्स्फूर्त एकजूट दाखवित सर्व व्यवहार बंद ठेवण्यासह स्वताःला घरात कोरोटांईन करुन घेतले. रस्त्यावर अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर एकही वाहन आले नाही. अशी नीरव शांतता बारामतीकरांनी प्रथमच अनुभवली. 

एरवी बंद, संप, मोर्चे या सह अनेक कारणांनी बारामती बंद राहिली, मात्र आजचा बंद ख-या अर्थाने इतिहासात नोंद व्हावी असाच होता. 

आज एकही बारामतीकर घराबाहेर पडला नाही आणि रस्त्यावर वाहन घेऊन उतरला नाही, त्यामुळे आज प्रथमच हॉर्नविरहीत बारामतीचा अनुभव आला. कधी नव्हे तो पक्ष्यांचा किलबिलाट आज प्रकर्षाने ऐकू येत होता. अत्यावश्यक सेवा वगळता आज शंभर टक्के बंदची प्रचिती येत होती. नगरपालिकेचे कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी वगळता रस्त्यावर कोणीही दिसून आले नाही. 

रविवारी तशीही बारामतीत वर्दळ तुरळकच असते, मात्र पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे व कोरोनावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे या भावनेतून लोकांनी उत्स्फूर्तपणे घरातच स्वताःला कोरोटांईन करुन घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati giving good Response to Janata Curfew on Coronavirus Issue