लॉकडाऊनमुळे बारामतीतील वाढू लागली अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार

उद्योजकांच्या संघटनांनाही चिंता

बारामती : लॉकडाऊनला आता तीस दिवसांचा कालावधी उलटून गेल्याने उद्योग क्षेत्रात अस्वस्थतेचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील एक मोठी एमआयडीसी म्हणून नावलौकीक असलेल्या बारामतीत दोन-चार कंपन्या वगळता इतरांचे कामकाज ठप्प असल्याने कामगारांच्या रोजीरोटीचा आणि अनेक ठिकाणी कंपनीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लॉकडाऊन संपल्यानंतर देखील कंपन्या लगेच सुरु होतील, अशी स्थिती नसल्याने नुकसानीची तीव्रता वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. बारामतीत जवळपास 400 छोटे मोठे उद्योग असून, जवळपास 20 हजार कामगार या कंपन्यांवर अवलंबून आहेत. यातील श्रायबर डायनामिक्ससारखी मोठी कंपनी वगळता इतर सर्वच कंपन्या गेला महिनाभर बंद आहेत.

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार

बारामती एमआयडीसीमध्ये पियाजिओ व्हेईकल्स ही सर्वात मोठी कंपनी असून, तीन चाकी, चार चाकी रिक्षा व स्कूटरचे उत्पादन येथे होते. वार्षिक तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपनीत चार हजारांवर कामगार काम करतात. 4 मे रोजी जरी लॉकडाऊन संपले तरी ही कंपनी रुळावर येण्यासाठी किमान महिन्याचा कालावधी जाईल, अशी स्थिती आहे. स्पेअर पार्ट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादनावरही अनेक बाबी अवलंबून आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योजकांच्या संघटनांनाही चिंता

उद्योग व्यवसाय लवकर सुरु झाले नाही तर औद्योगिक अर्थकारणाचे कंबरडे मोडेल, अशी भीती बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी व्यक्त केली. कामगारांच्या हाताला तातडीने काम मिळणे आवश्यक आहे, तसेच लघुद्योजकांनाही शासकीय स्तरावर मदत दिली गेली पाहिजे, अशी अपेक्षा इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी बोलून दाखविली. 

नुकसानीचा आकडा प्रचंड

मोठ्या कंपन्या बंद असल्याने होणाऱ्या नुकसानीचा आकडा प्रचंड असल्याने या संकटातून सावरण्यासाठी सर्वांनाच मोठा कालावधी लागणार हे उघड आहे. बारामती एमआयडीसीतील दोन प्रमुख कंपन्यांच्या महिन्याच्या नुकसानीचा ढोबळ आकडा पाचशे कोटींइतका प्रचंड आहे. या मोठ्या कंपन्यांचे विजेचे बिलच काही कोटी रुपयांमध्ये असून, पगार व इतर खर्च यांचा विचार करता नुकसान मोठे होणार आहे. 

नवसंजीवनीची गरज

बारामती एमआयडीसीतील उद्योगांना लॉकडाऊननंतर नवसंजीवनीची नितांत गरज आहे. कर्मचाऱ्यांचे प्रपंच व्यवस्थित राहावेत व उद्योगाची स्थितीही मजबूत राहावी, या दृष्टीने काही सकारात्मक पावले राज्य व केंद्र शासनाने उचलावित अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. 

अनेक घटकांमधील अस्वस्थता वाढू लागली

उद्योजकांप्रमाणेच रिक्षाचालक व केशकर्तनालय चालक यांनीही निवेदनाद्वारे मदतीचा हात मागितला आहे. महिना उलटून गेल्यावर आता उत्पन्नाचे साधनच राहिलेले नसल्याने रिक्षाचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

बारामतीत जवळपास 1700 रिक्षा आहेत त्यांच्या चालकांवर कठीण परिस्थिती ओढवली आहे. दुसरीकडे केशकर्तनालये देखील महिनाभर बंद असल्याने दुकानमालकांवर व दुकानातील कारागिरांवरही उपासमारीचे संकट घोंघावत आहे. लवकर या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati is in Tension Due to Lock Down