
पुणे प्लॉगर्स संस्थेच्यावतीने पिरियड ईज चळवळ सुरू
पुणे - माझं शिक्षण झालेले नाही, मुलं-बाळांची जबाबदारी, नवरा दारू पितो, दोन वेळच्या जेवणासाठी इकडं तिकडं मिळेल ते काम करायचं नी मग चार पैशे कमवायचे... मग पॅड का काय ते, त्याला कुठून खर्च करायचा... मासिक पाळीचं पॅड विकत घेणं म्हणजे एक वेळचं जेवण बंद... मुलं-बाळं उपाशी कशी ठेवायची? त्यामुळं कापडच वापरते बघ ! तेच बरं हाय... असं सांगत होत्या. खडकी येथील झोपडपट्टीत राहणारी शांती जगताप (नाव बदलण्यात आले आहे). शांती सारख्या अशा कित्येक महिला आहेत ज्यांना मासिक पाळीबद्दल असलेला गैरसमज किंवा आर्थिक परिस्थितीमुळे कापड किंवा इतर गोष्टी वापराव्या लागत आहेत. मासिक पाळीच्या दिवसांना सोयीचे करण्यासाठी पिरियड ईज’चा अनोखी चळवळ सुरू करण्यात आली आहे.
शहरातील एका तरुणाने महिलांच्या या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देत त्यावर तोडगा म्हणून या पिरियड ईज’ची सुरवात केली आहे. पुणे प्लॉगर्स या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष विवेक गुरव याच्या संकल्पनेतून ही चळवळ शहरासह देशाच्या विविध भागांमध्ये होणार आहे. याबाबत विवेक याने सांगितले, ‘‘ आज ही कित्येक महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पोन आदींचा वापर करता येत नाही. तसेच मासिक पाळीबाबत अनेकांना गैरसमज आहेत. या काळात कापड वापरणे किंवा काहीच न वापरता घरीच राहणे असा पर्याय निवडतात.
यामुळे आरोग्याची समस्या उद्भवते. दररोज काम करणे आणि पैसे मिळविणे हाच शांती यांच्यासारख्या अनेक महिलांचा उत्पन्नाचा पर्याय आहे. मासिक पाळीच्या काळात काहींना सात ते आठ दिवस घरीच थांबावे लागते. या काळात त्यांचे उत्पन्न ही थांबते. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पिरियड ईज’ उपक्रम राबविण्याचे ठरविले.’’
खडकी, विश्रांतवाडी, येरवडा आणि डेक्कन परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांशी या विषयावर चर्चा करताना त्यांना उद्भवत असलेल्या समस्यांबाबत समजले. देशातील अशा गरजू महिलांना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कप पुरविण्यासाठी सध्या दर महिन्याला ३० दिवस प्लॉगिंग ड्राईव्ह केली जात आहे. यातून निधी जमा केला जात असून सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण सुरू असल्याने तेथील नागरिकांना या उपक्रमासाठी प्लॉगिंग ड्राईव्हमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असेही विवेकने सांगितले.
पिरियड ईज’ म्हणजे काय ?
पिरियड ईज या चळवळी अंतर्गत गरजू महिलांना मासिक पाळीसाठी मेन्स्ट्रुअल कप किंवा पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरविणे, त्यांना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन करणे, त्यांचे गैरसमज दूर करण्यात येत आहे. यासाठी पुणे प्लॉगर्सने विविध संस्था आणि संघटनांशी समन्वय साधला असून प्लॉगिंगच्या माध्यमातून सोयी पुरविण्यासाठी निधी संकलित केला जात आहे. यासाठी प्रत्यक्ष शिबिरे, कार्यशाळा, सर्वेक्षण आणि समाज माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
पिरियड ईज’ची वाटचाल
हा उपक्रम भारतासह नेपाळ आणि बांगलादेश येथे ही राबविण्यात येणार
नेपाळच्या काही संस्थांशी यासाठी करार देखील करण्यात आला आहे
याची सुरवात पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद येथून करण्यात येत आहे.
‘‘मासिक पाळीबद्दल अजूनही बोलणे टाळले जाते. याबाबत असलेला ‘सोशल टॅबू’ मिटविण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. तसेच महिलांना पर्यावरणपूरक पॅड आणि मेन्स्ट्रुअलचा वापर करणे का योग्य आहे,याबाबत त्यांना माहिती देत आहोत. कारण या उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा धोका कमी केला जाऊ शकतो तसेच हे अनेक वर्षे वापरले जाऊ शकते. जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.’’
- राधिका ढिंगरा, संस्थापक अध्यक्ष- बदलाव फाउंडेशन.
Web Title: Period Is Movement Started On Behalf Of Pune Ploggers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..