

पेशावर, ता. १५ (पीटीआय) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये आज एका खासगी शाळेचे छत कोसळून २८ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ४० हून अधिक जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत विद्यार्थ्यांचे वय १३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी होते
या प्रकरणी शाळेच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातील दिर कॉलनीमध्ये ही घटना घडली. पेशावरचे पोलिस प्रमुख मियाँ सईद यांनी यांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. दुर्घटनेच्या वेळी तीन वर्गखोल्यांमध्ये ११० विद्यार्थी होते. त्यापैकी केवळ ४७ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीच्या कमकुवत बांधकामावर छताचे अतिरिक्त वजन पडले होते. त्यामुळे ते कोसळले, असे सईद यांनी सांगितले.
लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते महम्मद आसिम यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. कोसळलेल्या छताचा ढिगारा हटविण्याचे आणि त्याखाली आणखी विद्यार्थी किंवा शाळेतील कर्मचारी अडकले आहेत का, याचा शोध घेण्याचे काम बचाव पथकांकडून सुरू होते. पेशावरचे उपायुक्त अफाक वजीर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले केले आहे.