आसू : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

आसू : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Published on

फलटणच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी

रणजितसिंह निंबाळकर; पालिकेच्या आढावा बैठकीत शहर ‘अ’ वर्ग करण्याचा संकल्प

आसू, ता. ६ : फलटण शहराचा कायापालट करण्यासाठी आणि भविष्यात या शहराला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी नगरपालिका, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत. फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी व चौधरवाडी या गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यासह पालिकेला ‘अ’ वर्गात नेण्याचा संकल्प माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण नगरपालिकेची आज आढावा बैठक रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीस ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव, तसेच विविध विभागांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उद्यान, रस्ते, अद्ययावत नाट्यगृह, तारांगण आणि सुसज्ज रुग्णालय यांसारखी कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पार्किंग सुविधांवर भर दिला जाणार आहे. विशेषतः जुन्या सुपर मार्केटच्या जागी आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला.
शहरातील स्वच्छतेसाठी १० नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे, पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण आणि दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र आठ ते नऊ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दगडी पुलाजवळील नाल्याच्या कामासाठी साडेतीन कोटी आणि पाणी पुरवठा योजनेसाठी आठ कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्यास किंवा कामे रेंगाळल्यास संबंधित ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा रणजितसिंह यांनी दिला. शहराचा विकास हा जिल्हा मुख्यालयाला साजेसा असावा, याच उद्देशाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक- निंबाळकर, महाराजा मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले, नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, सनी (भैय्या) मांढरे व श्रीवल्लभ हेंद्रे आदींची उपस्थिती होती.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा आढावा सादर केला.
-------------------------
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

* प्रमुख चौकांत १० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे
* पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण
* पाण्याच्या पाइपलाइनसाठी आठ कोटींचा अतिरिक्त निधी
* दलित वस्तीसाठी आठ ते नऊ कोटींची विकासकामे
* दगडी पुलाजवळील नाल्यासाठी साडेतीन कोटींचा निधी
* फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण उभारणे
* विमानतळ परिसरात हेलिपॅड, हॅंगिंग गार्डन व ॲमिनिटी पार्क
* शहरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे व कंट्रोल रूम उभारणे
* नगरपालिका इमारतींवर सोलार प्रकल्प राबवून वीजबिल कमी करणे
* शहरात विविध ठिकाणी पार्किंग सुविधा उभारणे
* सुपर मार्केटची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पार्किंग व आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे

----------------------------

02577
फलटण : बैठकीत रणजितसिंह नाईक- निंबाळकर, समवेत समशेरसिंह नाईक- निंबाळकर, जिजामाला नाईक- निंबाळकर, प्रियदर्शनी भोसले, निखिल जाधव आणि इतर.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com