पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्प : नागरिकांसाठी मूलभूत सुविधांवर भर

Budget
Budget

पिंपरी - सद्यःस्थिती व भविष्यातील विचार करता नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यावर महापालिकेच्या अर्थसंकल्पात भर दिलेला दिसतो. त्यात अधिकचे पाणी उपलब्ध करण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम आगामी वर्षात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. तसेच रस्त्यांचे सुशोभीकरण, उद्यानांची निर्मिती, वनीकरण, नद्यांची सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन आदी कामांवरही भर दिलेला आहे. 

पाणीदार वर्ष
आंद्रा व भामा-आसखेड धरणांतून पाणी उचलण्यासाठी पुनर्स्थापना किंवा पुनर्वसन खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. दोन्ही प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, पंपाद्वारे पाणी उचलणे (रायझिंग मेन), धरणांतून वाहिन्यांद्वारे पाणी सोडणे (ग्रॅव्हिटी मेन) आणि बांध बांधणे, अशा कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आगामी वर्षात कामे सुरू होतील. तसेच, या प्रकल्पांतर्गत शहरात पाणीवितरणासाठी टाक्‍या बांधणे, जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा कार्यवाही सुरू केलेली आहे. तसेच, पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यावरील अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपांची व निगडी-प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी तरतूद केली आहे.

रोजगारनिर्मितीवर भर
पुणे सिटी कनेक्‍ट डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्याने शहरात ‘लाइट हाउस रोजगारनिर्मिती’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत १८ ते ३० वयोगटातील युवक, युवती, महिला, विद्यार्थी यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी कंपन्यांच्या ‘सीएसआर’च्या (सामाजिक दायित्व निधी) माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल. तसेच, कर्मचाऱ्यांची नियुक्तीही संबंधित फाउंडेशनच करणार आहे. केवळ लोकसहभाग व लाभार्थी मिळवून देण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाकडील समूह संघटकांची मदत फाउंडेशनला दिली जाणार आहे.

नदीसुधार प्रकल्प
पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नद्यांच्या काठ सुशोभीकरणावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी नद्यांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एच. सी. पी. कन्सलटंट यांची नियुक्ती केलेली आहे. नद्यांचा प्रकल्प विकास आराखडा तयार केला जात आहे. तसेच, मुळा नदीचा काठ पुणे महापालिकेच्या सहकार्याने सुधारण्यात येणार आहे. त्यांच्याकडून कार्यवाही सुरू झालेली आहे. या नद्यांच्या सुधारणांसाठी ६५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

जलनिस्सारणावर भर
शहरातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यानुसार अमृत योजनेअंतर्गत २०९ किलोमीटर लांबीच्या जलनिस्सारण नलिकांची कामे मंजूर केली आहेत. गावठाण भागामधील नलिकांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत १०० किलोमीटरच्या वाहिन्या बदलल्या असून, आगामी वर्षात १०९ किलोमीटरच्या वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. पिंपळे निलख, चिखली, बोपखेल येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे. समाविष्ट गावांमध्ये ४० किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. त्यांना घराघरांतील सांडपाणी वाहिन्या जोडण्यावर भर दिला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन
शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मोशी कचरा डेपो येथे राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रतिदिन एक हजार मेट्रिक टन कचऱ्याचा वापर केला जात आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्याद्वारे प्रतिदिन ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच, बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याबाबतच्या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जात आहे. 

महिला स्वावलंबन 
नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शहरातील बचत गटांचे सर्वेक्षण करणे, त्यांची क्षमता विकसित करणे, महिलांचे कौशल्य वाढविणे, बॅंक व वित्त संस्थांमार्फत कर्ज प्रक्रियेमध्ये आणणे, मायक्रो फायनान्स, विमा व आरोग्य विमा अशा सुविधा उपलब्ध करून देणे, बचत गट सदस्यांचे जीवनमान सुधारणे, त्यांच्याकडून उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी साह्य करणे, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे, अशा माध्यमातून महिला सबलीकरणावर भर दिला जाणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण योजनेत स्वतंत्र तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com