सणासुदीला स्वस्त धान्य तुटवडा

सणासुदीला स्वस्त धान्य तुटवडा
Published on: 

पंकज खोले ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ ः दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर आली असताना पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक धान्यवाटप व्यवस्थेतील अडथळ्यांमध्ये वाढ झाली आहे. दसऱ्याच्या तोंडावर ई-पॉस मशिन बंद पडल्याने रखडलेले धान्यवाटप आता सुरू झाले आहे. मात्र, अनेक स्वस्त धान्य दुकानांत तांदूळच पोहोचलेला नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे धान्य अद्याप पूर्णपणे मिळालेले नाही. सणासुदीच्या काळात धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अन्नधान्य पुरवठा विभागाची तीन कार्यालये आहेत. चिंचवड ‘अ’, पिंपरी ‘ज’ आणि भोसरी ‘फ’ या परिमंडळांतर्गत धान्यवाटप केले जाते. तीनही कार्यालये मिळून एक लाख २८ हजार ९२९ शिधापत्रिकाधारक असून, चार लाख ८२ हजार ३१४ नागरिक लाभार्थी आहेत. मात्र, ई-पॉस मशिन वारंवार बंद पडणे, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी आणि धान्याचा अपुरा पुरवठा यांमुळे नियमित वितरणात व्यत्यय येत आहे. परिणामी, ऑक्टोबर महिन्यातील तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही अनेक लाभार्थ्यांना पूर्ण धान्य मिळालेले नाही. विशेषतः पिंपरी ‘ज’ परिमंडळातील अनेक दुकानांमध्ये तांदूळ उपलब्ध नसल्याने अपूर्ण धान्यावर समाधान मानावे लागत आहे.

गहू-तांदूळ मिळण्याची अपेक्षा
विविध योजनांचा लाभ आता मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहेच. त्‍यातच नियमित कोट्यातील गहू आणि तांदूळ तरी वेळेत मिळावेत, अशी अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहेत. धान्यवाटपातील अनियमितता कायम असताना संबंधित अधिकारी कार्यालयांत उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे तक्रार नोंदवायची कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक कामामुळे अधिकारी अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

धान्य वितरणातील अडथळे
- धान्‍यवाटप अपुरे व अनियमित
- वारंवार बंद पडणारे सॉफ्टवेअर
- वितरण व्यवस्थेतील अधिकारी गायब
- दुकानदारांच्या कार्यालयात हेलपाटे
- चालू महिन्याचे धान्‍य वाटप अर्धवट
- सणासुदीच्या काळात नागरिकांचे डबे रिकामे

एक हजार टन तांदळाचे वाटप
पिंपरी चिंचवड अंतर्गत जवळपास साडेचार लाख लाभार्थींना दरमहा धान्‍यवाटप होते. त्‍यात गहू दीड हजार टन, तांदूळ एक हजार टन असतो. मात्र, सध्या पिंपरी कार्यालयाअंतर्गत १५ टक्‍के दुकानांत तांदूळ उपलब्‍ध नाही.

स्थलांतरित २५ टक्‍के कुटुंब
दुष्‍काळामुळे शेती व रोजगार नसलेले अनेक कुटुंबीय रोजगारासाठी शहरात आले आहेत. असे सुमारे २५ टक्के व्यक्ती स्‍वस्‍त धान्‍य घेण्यासाठी दुकानांत येतात. यात मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची संख्या अधिक आहे, असे एका स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले.

असे आहेत शिधापत्रिकाधारक
कार्यालय / शिधापत्रिका / लाभार्थी
पिंपरी ‘ज’ / ३७,६२३ / १,४३,०८७
चिंचवड ‘अ’ / ४५,१७५ / १,६७,२२७
भोसरी ‘फ’ / ४६,१३१ / १,७२,०००
एकूण / १,२८,९२९ / ४,८२,३१४

स्वस्त धान्य दुकानात तांदूळ उपलब्ध नाही. दोन दिवसांपूर्वी दुकानात गेले होते. दोन दिवसांत येईल, असे सांगण्यात आले. अद्याप धान्‍य मिळाले नाही.
- धनश्री कांबळे, शिधापत्रिकाधारक, पिंपरी

शिधापत्रिका ऑनलाइन काढली आहे. त्‍यात परिमंडळ कार्यालयाने काही त्रुटी सांगितल्या आहेत. शिवाय, सॉफ्टवेअर बंद असल्‍याने पुन्‍हा बोलावले आहे. आजची सुटी वाया गेली.
- सुभाष सारळकर, शिधापत्रिकाधारक, सांगवी

शिधापत्रिकाधारकांना धान्‍य वाटप लवकरच पूर्ण होईल. तांदूळ मिळाला नसल्याच्या काही दुकानदारांच्या तक्रारी आहेत. त्‍याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- प्रदीप डंगारे, परिमंडळ अधिकारी, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com