

पिंपरी, ता. १३ ः पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यात खंडित वीजपुरवठ्याचा फटका लघु व मध्यम उद्योगांना बसत आहे. वीज उपकेंद्रांच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव मंजूर होऊनही कामे रखडल्याने उत्पादनावर परिणाम होत असून, उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
औद्योगिक शहर म्हणून नावारूपास आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये १५ हजारांहून अधिक उद्योग आहेत. सध्या कार्यरत असलेल्या वीजवाहिन्यांवरील भार सातत्याने वाढत आहे. त्यातच अनेक वाहिन्या ४० वर्षांहून अधिक जुन्या झाल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी उद्योजकांची तक्रार आहे. नवीन वीजवाहिन्या, उपकेंद्रे आणि रोहित्रांची कामे प्रस्तावित असतानाही ती अद्याप सुरू झालेली नाहीत.
जनरेटरचा अतिरिक्त खर्च
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उत्पादन सुरू ठेवण्यासाठी उद्योजकांना जनसेट किंवा जनरेटरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असून, देखभाल व दुरुस्तीचा खर्चही वाढतो. जनसेट उभारण्यासाठी सुमारे ५०० चौरस फूट जागा आवश्यक असल्याने लघुउद्योजकांसमोर अतिरिक्त अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा मिळणे आवश्यक असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
जुन्या वाहिन्यांवर वाढता भार
शहरातील औद्योगिक तसेच निवासी भागात अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या विद्युतवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यावर वाढता भार पडत असल्याने वारंवार तांत्रिक अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. नव्या वाहिन्या टाकण्याबरोबरच उपकेंद्रे आणि रोहित्रांची क्षमता वाढविण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.
‘‘महावितरणच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी उपकेंद्रे प्रस्तावित आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास उद्योजकांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल. सध्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.’’
- प्रमोद राणे, उद्योजक, भोसरी
‘‘वीजपुरवठा सुरळीत आहे. औद्योगिक क्षेत्रातील तक्रारींचे तातडीने निराकरण केले जाते. तसेच, वीजपुरवठ्याचा नियमित आढावाही घेतला जात आहे.’’
- विश्वनाथ लहाने, कार्यकारी अभियंता, भोसरी
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.