

पिंपरी, ता. १५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत अधिकृत ओळखपत्र दर्शनी भागावर परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह क्षेत्रीय कार्यालये आणि विविध विभागांमध्ये दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. मात्र, संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी नेमका कोण, हे नागरिकांना अनेकदा समजत नाही. काही ठिकाणी बाहेरील व्यक्ती किंवा दलाल कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार, कार्यालयात प्रवेश करताना तसेच संपूर्ण कार्यालयीन वेळेत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ओळखपत्र गळ्यात किंवा दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. ओळखपत्र केवळ खिशात किंवा टेबलावर ठेवणे ग्राह्य धरले जाणार नाही. वर्ग एकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना हा नियम लागू राहणार आहे.
विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील अधिकारी-कर्मचारी ओळखपत्राचा नियमित वापर करीत आहेत की नाही, याची खात्री करावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. औचक तपासणीदरम्यान विनाओळखपत्र कर्मचारी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
पूर्वीही झाली होती सक्ती
तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी आणि राजेश पाटील यांच्या कार्यकाळातही महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्राची सक्ती करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर या नियमाच्या अंमलबजावणीत शिथिलता आली. आता आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी हा नियम पुन्हा प्रभावीपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयांमधील दलालांच्या हस्तक्षेपाला आळा बसण्यासह नागरिकांना अधिकृत अधिकारी-कर्मचाऱ्यांची सहज ओळख होण्यास मदत होणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.