

पिंपरी, ता. ११ : ‘सुरक्षित पदपथ आणि रस्त्यावरून सुरक्षित चालणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,’ असे निर्देश सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे शहरातील मुख्य रस्ते आणि उपनगरांमधील पादचाऱ्यांचा हा अधिकार केवळ कागदावरच उरल्याचे विदारक चित्र आहे. वाढती अतिक्रमणे, बेकायदेशीर पार्किंग आणि दुर्लक्षामुळे पादचाऱ्यांना थेट मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमधील पदपथांवर फेरीवाले, लहान व्यावसायिक व दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. अनेक ठिकाणी दुकानांचे फलक, बांधकाम साहित्य आणि कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. त्यातच वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी दुचाकीस्वार थेट पदपथांवरून गाड्या चालवत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पदपथांची दुरवस्था अन् अयोग्य उंची
शहरातील पदपथांची दुरवस्था, असमान उंची, निकृष्ट बांधकाम आणि अयोग्य नियोजनामुळे त्यावर चालणे कठीण झाले आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी होणारी कारवाई केवळ नावापुरतीच ठरत असून, पथक जाताच ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. ठोस दंडात्मक कारवाई होत नसल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
न्यायालयाचे महत्त्वाचे ताशेरे
- मूलभूत अधिकार : राज्यघटनेच्या कलम २१ (जगण्याचा अधिकार) आणि कलम १९(१)(ड) (मुक्त संचाराचा अधिकार) अंतर्गत सुरक्षित चालण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
- स्थानिक प्रशासनाची जबाबदारी : रस्त्यांसोबत सुस्थितीतील पदपथ उपलब्ध करून देणे महापालिकेची कायदेशीर जबाबदारी आहे.
- वाहनांपेक्षा पादचाऱ्यांना प्राधान्य : मोटार वाहनांच्या विशेषाधिकारापेक्षा पादचाऱ्यांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पदपथांअभावी नागरिकांना रस्त्यावर चालावे लागणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
‘‘महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘प्रवेश योग्यता आणि पादचारी कक्ष’ची तत्काळ स्थापना करण्यात यावी. हा कक्ष क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पादचारी सुरक्षेशी संबंधित सर्व उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, समन्वय व देखरेख करेल.’’
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, महापालिका
‘‘केवळ कागदी नियम नकोत, प्रशासनाने प्रत्येक रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करून ते पादचाऱ्यांसाठी खुले करावेत. पदपथांवर जागाच नसल्याने मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या मधून वाट काढावी लागते. दिव्यांग व्यक्तींसाठी तर हे पदपथ पूर्णपणे निरुपयोगी ठरत आहेत.’’
- रमेश पाटील, पादचारी, चिंचवडगाव
‘‘अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही रस्त्याच्या बाजूला आणि पदपथांवर वाहने पार्क करू नयेत.
- विक्रांत देशमुख, उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
फोटो ः 38462
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.