

चिंचवड, ता.६ : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (ता. ६) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन स्फोटासह आग लागली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरासह परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. आगीचे लोळ व धुराचे लोट परिसरात दिसून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग नियंत्रणात आणण्यात आली असून बिघाड झालेला भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
चिंचवड येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात दुपारी सुमारे १२.२५ वाजता २२ केव्ही सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) आणि सर्किट ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला. त्यानंतर उपकेंद्रात आग लागली. या प्रकारामुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या अनेक २२ केव्ही उच्चदाब वाहिन्यांवर परिणाम झाला. परिणामी, पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागासह प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
महापारेषणकडून बिघाड झालेला भाग वगळून उपकेंद्रातील इतर भाग सुरक्षित करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर महावितरणकडून पर्यायी वीजवाहिन्यांद्वारे शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सीटी आणि ब्रेकरचे कार्य काय?
करंट ट्रान्सफाॅर्मर (सीटी) हे अतिउच्च विद्युत प्रवाहाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. ते मोठ्या प्रवाहाचे प्रमाण कमी करून संरक्षण यंत्रणा व मोजणी उपकरणांना सुरक्षित पातळीवरील विद्युत संकेत देते. ब्रेकर हे विद्युत यंत्रणेतील महत्त्वाचे संरक्षण उपकरण असून शॉर्टसर्किट, अतिप्रवाह किंवा अन्य बिघाड झाल्यास विद्युत प्रवाह तातडीने खंडित करून मोठी दुर्घटना टाळण्याचे काम करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.